सोशल मीडियाच्या दुरुपयोगाकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:38+5:302021-07-19T04:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कागल : सध्या सायबर क्राईम वाढत चालले आहे. ॲन्ड्राॅईड मोबाईल हे सध्या वरदान आणि शापही ठरत ...

सोशल मीडियाच्या दुरुपयोगाकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : सध्या सायबर क्राईम वाढत चालले आहे. ॲन्ड्राॅईड मोबाईल हे सध्या वरदान आणि शापही ठरत आहेत. फेसबुक, व्हाॅट्सॲप यासारख्या समाजमाध्यमांचा दुरुपयोग करून महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे पोलीस यंत्रणेने विशेष लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल शहरात नगरपालिकेच्यावतीने ‘सुरक्षित शहर’ या उपक्रमांतर्गत बसविण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. यंत्रणेचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ आणि जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले, यावेळी मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माणिक माळी होत्या. आय. सी. आय. सी. सी. बॅक, नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन यांच्या मदतीने शहरात महत्त्वाच्या २८ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुश्रीफ म्हणाले, या यंत्रणेमुळे कागल शहरातील रस्ते सुरक्षित बनले आहेत. जयसिंगराव पार्कात असलेल्या फौजदार बंगल्याजवळ अद्ययावत पोलीस ठाणे बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. डाॅ. शैलेश बलकवडे, आय. सी. आय. सी. सी. बॅकेचे विकास देशमुख, जिल्हा बॅकेचे संचालक भय्या माने यांनीही मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी आभार मानले. कागल पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाला चद्रंकात गवळी, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, मुख्याधिकारी टिना गवळी, नितीन दिंडे, माधवी मोरबाळे, नगरसेवक आनंदा पसारे, सौरभ पाटील, ॲड. संग्राम गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरक्षित शहराचा फायदा...
जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. शैलेश बलकवडे म्हणाले, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे शहराची वाढ होत आहे. औद्योगिकीकरण आले की गुन्हेगारीही वाढते. पण कागल त्याला अपवाद असून, आता या सुरक्षित शहर उपक्रमाने नवे उद्योग, कंपन्याही कागलमध्ये येण्यास उत्सुक होतील.
फोटो कॅप्शन
कागल शहरात सुरू करण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. यंत्रणेचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष माणिक माळी, भय्या माने, विकास देशमुख, आदी उपस्थित होते.