वादळी पावसातही पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:40+5:302021-05-17T04:21:40+5:30
कोल्हापूर : रिमझिम पाऊस आणि वादळी वाऱ्यातही कडक लॉकडाऊनसाठी रविवारी पोलिसांनी रस्त्यावर थांबून चोख बंदोबस्त बजावला. रस्त्यावरून फिरणाऱ्या चारचाकी ...

वादळी पावसातही पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर
कोल्हापूर : रिमझिम पाऊस आणि वादळी वाऱ्यातही कडक लॉकडाऊनसाठी रविवारी पोलिसांनी रस्त्यावर थांबून चोख बंदोबस्त बजावला. रस्त्यावरून फिरणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली. चौका-चौकांत, प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मोठ्या संख्येने पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली. पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे तसेच नागरिकांच्या प्रतिसादामुळे लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशीच संपूर्ण शहरातील रस्ते निर्मनुष्य राहिले. पोलीस अधिकाऱ्यांनीही फिरती करून बंदोबस्तावर नजर ठेवली.
कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने ती थोपविण्यासाठी जिल्ह्यात शनिवारी (दि. १५ मे) मध्यरात्रीपासून दि. २३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन पुकारला. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठा येथे पोलीस यंत्रणा तैनात केली आहे. शहरातील प्रमुख नऊ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात होती. प्रमुख रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रस्त्यात वाहनांना अडथळे निर्माण केले होते.
पोलिसांना पावसात आडोसा...
रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस व वादळी वाऱ्याचीही तमा न बाळगता पोलिसांनी चौका-चौकांत चोख पोलीस बंदोबस्त बजावला. बंदोबस्तावेळी पाऊस आल्यास पोलीस रस्त्याकडेच्या मिळेल त्या आडोशाचा आसरा घेत होते. शहरात प्रवेशणाऱ्या मार्गावरही चोख पोलीस बंदोबस्त होता. प्रत्येक वाहनधारकाला अडवून त्यांच्याकडील कागदपत्रांची कसून तपासणी केली जात होती.
फक्त रुग्णालय, औषधे, लसीकरण कारण
कोणत्याही कारणास्तव बाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही काहीजण दूध, भाजीचे निमित्त काढून घराबाहेर पडणाऱ्यांची तमा बाळगली नाही. अशा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवून पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्याशिवाय रुग्णालय, औषध तसेच लसीकरणासाठी जाणाऱ्यांकडील कागदपत्रे व मोबाईलवरील संदेशाची कसून तपासणी करूनच त्यांना पुढे सोडले जात होते.
जिल्ह्यात ३५०० पोलिसांची फौज
कोल्हापूर शहरासह नगरपारिषद, मोठ्या गावांतही लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी सुमारे साडेतीन हजार पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये २०० पोलीस अधिकाऱ्यांसह २२०० पोलीस आणि ११०० गृहरक्षक दलाच्या जवानांचा सहभाग होता. तीन पाळीत या पोलीस कर्मचाऱ्यांचे बंदोबस्तासाठी विभाजन केले आहे. त्यामध्ये तीन टप्प्यात बंदोबस्तावर नजर ठेवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
अधिकाऱ्यांची फिरती
शहरात सकाळच्या वेळेत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे तसेच प्रभारी शहर पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभारी अधिकाऱ्यांनी फिरती करून बंदोबस्तावर नजर ठेवली. दुपारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीत फेरफटका मारून बंदोबस्तावर नियंत्रण ठेवले होेते.
अत्यावश्यक सेवा करा, पोलिसांच्या साथीने
बंदोबस्तावरील पोलीस अगर काही निराधार कुटुंबीयांना मदतीसाठी कोल्हापुरात सेवाभावी संस्था अगर व्यक्ती नेहमीच पुढाकार घेतात, हे वाखाणण्याजाेगे आहे; पण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही रस्त्यावर विनाकारण फिरत असल्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अत्यावश्यक सेवा करा, पण ती त्या-त्या हद्दीतील पोलीस ठाण्याच्या मदतीने करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
पावसाने पोलिसांवरील ताण कमी
दिवसभर पाऊस, वारा व ढगाळ वातावरण राहिले, त्यातच घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे तसेच नागरिकांनीही दिलेल्या प्रतिसादामुळे पोलीस यंत्रणा रस्त्यावर असली तरीही त्यांच्यावर बंदोबस्ताचा ताण काहीसा कमी जाणवला.
फोटो नं. १६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो०३,०५
ओळ : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर शहरात रविवारी पावसातही पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. व्हीनस कॉर्नर चौकात वाहनधारकांची पोलिसांनी अडवणूक केली. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
160521\16kol_21_16052021_5.jpg~160521\16kol_22_16052021_5.jpg
===Caption===
ओळ : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर शहरात रविवारी पावसातही पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहनांची कसून तपासणी केली. व्हिनस कॉर्नर चौकात वाहनधारकांची पोलिसांनी आडवणूक केली. (छाया: नसीर अत्तार)~ओळ : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर शहरात रविवारी पावसातही पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहनांची कसून तपासणी केली. व्हिनस कॉर्नर चौकात वाहनधारकांची पोलिसांनी आडवणूक केली. (छाया: नसीर अत्तार)