पोलीसमामांच्या घरांना अवकळा
By Admin | Updated: October 21, 2014 23:41 IST2014-10-21T20:36:03+5:302014-10-21T23:41:59+5:30
सार्वजनिक हॉल धोकादायक स्थितीत

पोलीसमामांच्या घरांना अवकळा
अतुल आंबी -इचलकरंजी -चोवीस तास समाज रक्षणासाठी दक्ष राहावे लागणाऱ्या पोलिसांच्या घरांची दुरवस्था झाल्याने त्यांची झोप (विश्रांती) उडाली आहे. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी अवस्था पोलिसांची बनली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. -येथील थोरात चौकात असलेल्या पोलीस क्वॉर्टर्समधील सात इमारतींमध्ये एकूण १०२ सदनिका आहेत. त्यालगत अधिकाऱ्यांसाठी तीन स्वतंत्र इमारती आहेत. सुमारे २४ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतींच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस त्यांची दुरवस्था वाढत गेली. अनेक सदनिकांमध्ये पाण्याची गळती, ड्रेनेजची गळती व पडझड झाल्याने सध्या तेथे फक्त ३६ कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत राहतात. सध्या अनेक सदनिकांना दरवाजे, खिडक्या नाहीत. फरशा खराब झाल्या आहेत. भिंतीसह स्लॅबचा गिलावा पोकळी धरत असल्याने त्याचीही पडझड होत आहे. इमारतींवर झाडे उगवली आहेत. त्यांची मुळे भिंतीत घुसल्यामुळे या इमारती कधीही ढासळू शकतात, अशी अवस्था झाली आहे. चार मजली इमारती असल्या तरी अनेक इमारतींमध्ये पडझड झाल्याने दोनच मजल्यांपर्यंत राहण्यासारखी अवस्था आहे.
गेल्या वर्षी ६० लाख रुपयांचा निधी मिळाला. मात्र, त्यामध्ये आठच खोल्यांची दुरुस्ती होऊ शकली. त्यामध्ये काही खोल्या आतून पाडून एकत्र करून थोड्या मोठ्या करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित सदनिका तशाच दुरवस्थेत आहेत. अनेक सदनिकांची ड्रेनेज लाईन खराब झाल्याने शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे. चौथ्या मजल्याच्या टेरेसवर बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या खराब झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या बसविल्या. मात्र, पाईपलाईनची दुरवस्था झाल्याने प्रत्येक मजल्याला पाणीपुरवठा विस्कळीतपणे होतो.
घरामध्ये समाधान असल्यास पोलीस ड्यूटीवर चांगली कामगिरी करू शकतो. मात्र, परिवारातील सदस्य नेहमी धोकादायक स्थितीत राहत असतील, तर त्या पोलिसांची मानसिकता काय होत असेल? समाजातील वेगवेगळ्या कामाचा ताण सहन करून विश्रांतीसाठी घरी गेल्यावर घराची दुरवस्था पाहून थकवा दूर होण्याऐवजी वाढतोच. त्यामुळे अनेक व्याधींना पोलिसांना सामोरे जावे लागते. त्यामुळे काही कर्मचारी अशा क्वॉर्टर्समध्ये राहण्याऐवजी शहरात अन्यत्र भाड्याने राहतात, तर काहीजण परगावाहून ये-जा करतात. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले आहे.
सार्वजनिक हॉल धोकादायक स्थितीत
पोलीस क्वॉर्टर्सलगत सुमारे दहा वर्षांपूर्वी एका सार्वजनिक हॉलचे बांधकाम करण्यात आले. गोडाऊनसारख्या बांधण्यात आलेल्या या हॉलची संरक्षण भिंत एका ट्रक अपघातात पडली. त्यानंतर ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे झाल्याने काही लोकांनी तेथील विटा व अन्य साहित्य पळविले आहे. या हॉलच्या एका बाजूच्या भिंतीची जास्तच दुरवस्था झाल्याने हा हॉल कधीही कोसळू शकतो, अशा धोकादायक स्थितीत आहे.