पोलीसलाईन, विकासकामे ‘फाईन’

By Admin | Updated: March 12, 2015 00:06 IST2015-03-11T23:48:29+5:302015-03-12T00:06:03+5:30

प्रभागात सर्वाधिक निधी खर्च : पण खेळाचे मैदान, ड्रेनेजलाईनची सोय नाही

Police line, development works 'Fine' | पोलीसलाईन, विकासकामे ‘फाईन’

पोलीसलाईन, विकासकामे ‘फाईन’

‘पोलीसलाईन’ प्रभाग क्र. ८ मध्ये देवणेमळा, कारंडेमळा, शाहू कॉलनी, हिम्मत बहाद्दूर परिसर, आकाशवाणी केंद्र परिसर, पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन, सर्किट हाऊस, आदी परिसरांसह आठ ते दहा लहान-मोठ्या विकसित झालेल्या कॉलन्यांसह शेतीचा काही भाग येतो. इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागात सर्वाधिक म्हणजे तब्बल पाच कोटींपेक्षा जास्त निधीचे रस्ते, गटारी, चॅनेल, रस्त्यांवरील दिवे, पिण्याच्या पाण्याची सोयही झाली आहे. एकंदरीत या प्रभागातील मूलभूत सुविधा सोडविण्यात नगरसेवकांना यश आले आहे.
विस्तीर्ण भौगोलिक रचनेत हा प्रभाग विखुरला आहे. उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, नोकरदार आणि कष्टकरी वर्गाचा या प्रभागात प्रामुख्याने समावेश आहे. याठिकाणी नगरसेवकांचा संपर्क चांगला आहे. मात्र, काही ठिकाणी गटारी, रस्ते साफ करण्यासाठी आणि औषध फवारणी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी वेळेत येत नाहीत, अशी तक्रार आहे. पाण्याची वेळही आणखी थोडी वाढवावी, अशी मागणीही महिला वर्गाची काही ठिकाणी आहे.
या प्रभागात नगरसेवकांनी विकासकामांचा सपाटा लावला असला, तरी प्रभागात ‘ड्रेनेजलाईन’ची सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांची ड्रेनेजलाईन व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. काही ठरावीक भाग सोडल्यास महापालिकेची ड्रेनेजलाईन उपनगर परिसरात कोठेही नाही. नगरसेवकांनी त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे; परंतु अद्याप ड्रेनेज लाईन झालेली नाही. प्रभागातील आणखी एक मोठी समस्या म्हणजे, या प्रभागात कोठेही खेळाचे मैदान नाही. बहुतेक सर्व जागा आरक्षित झालेल्या आहेत. प्रभागाचा विस्तार शेतवाडीत प्लॉट पाडून घरे बांधण्यात येत असल्याने कॉलनीतील रस्ते, गटारी करताना निधीची कमतरता भासत असतानाही शक्य तिथे रस्ते, गटारींची कामे करण्यात नगरसेवकांना यश आले आहे.
नगरोत्थान योजनेतून प्रभागात एकाही रुपयाची विकासकामे झालेली नाहीत. तरीही नगरसेवकांनी विकासकामे आपल्या मंजूर बजेटमधून केली आहेत. सर्किट हाऊस ते ड्रेनेज प्लँट, ईगल पाईप रोड, शाहू कॉलेज ते देवणेमळा, आदी रस्त्यांवर कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. त्याशिवाय प्रभागातील अंतर्गत रस्ते, गटारी व चॅनेलची कामेही करण्यात आली आहेत. प्रभागातील पिण्याच्या पाण्याची चांगली सोय व्हावी म्हणून तब्बल नऊ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून व ठिकठिकाणी व्हॉल्व्ह बसवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे.

Web Title: Police line, development works 'Fine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.