कळंबा येथील मृतदेहाबाबत पोलिसांचा तपास गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:04+5:302021-04-25T04:23:04+5:30
कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे शेतात सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलीस तपास करत आहेत. शनिवारी त्याचा भाऊ, गोव्यातील मुलांचाही जबाब ...

कळंबा येथील मृतदेहाबाबत पोलिसांचा तपास गतीने
कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे शेतात सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलीस तपास करत आहेत. शनिवारी त्याचा भाऊ, गोव्यातील मुलांचाही जबाब नोंदवला. वासुदेव देमाण्णा हुंद्रे (वय ५०, रा. वसवली, ता, हल्लाळ, कारवार) असे त्यांचे नाव आहे. ते पुलाची शिरोली येथून गावी जातो म्हणून बाहेर पडले होते, त्यानंतर पुढे पाच दिवसांनी त्यांचा मृतदेह कळंबा येथे सडलेल्या अवस्थेत मिळाला. त्यामुळे तो खून की आत्महत्या या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वासुदेव हुंद्रे हे शिरोली येथील बांधकाम ठेकेदाराकडे सेंट्रिंग कामगार होते. ते इतर तीन कामगारांसह पुलाची शिरोली येथे एकत्रित खोलीत राहत होते. त्यांच्या मागे गावाकडे एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे. लॉकडाऊन असल्याने दि. १७ एप्रिलला त्यांनी ठेकेदाराकडून काही पैसे घेऊन गावी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर शुक्रवारी कळंबा येथे त्यांचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. त्यांना दारूचे व्यसन होते. गावी जाण्यासाठी शिरोली ते कळंबा बसमध्ये बसले असावेत व दारूच्या नशेत मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी कळंबा येथेच उतरले असावेत, तेथे परिसरात फिरताना त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला आहे.