पोलिसांची खाबूगिरी पुन्हा चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 23:29 IST2016-11-11T23:29:43+5:302016-11-11T23:29:43+5:30
रौप्यनगरीची बदनामी : वर्षभरात सात कर्मचाऱ्यांवर खंडणी, लाचखोरी प्रकरणात कारवाई

पोलिसांची खाबूगिरी पुन्हा चव्हाट्यावर
तानाजी घोरपडे -- हुपरी--अवघ्या एक वर्षाच्या काळामध्ये हुपरी (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्यातील सात पोलिस कर्मचाऱ्यांना खंडणी व लाचखोरी प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईस सामोरे जाऊन घरचा रस्ता धरावा लागला.
या सर्व घटनांतून हुपरी पोलिसांची खाबूगिरी समोर येत आहे. संपूर्ण देशात रौप्यनगरी असा नावलौकिक असलेल्या चमचमत्या चंदेरी शहराच्या पोलिस ठाण्याच्या काळ्याकुट्ट कारभारामुळे शहराच्या नावलौकिकास मात्र पोलिसांच्या या कृत्यामुळे काळिमा फासला जात आहे.
हुपरी व परिसरातील गावागावांत सुरू असणारा चांदी व्यवसाय, जवाहर साखर कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत याबरोबरच दिवसेंदिवस वाढत चाललेले औद्योगिकीकरण यामुळे परिसराचा ग्रामीण बाज लोप पावला जात असून, शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. या सर्व घडामोडीबरोबरच समाजाला घातक ठरणारा अवैध व्यवसाय व गुन्हेगारीकरणही मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे.
मटका, गुटखा, हातभट्टी, वडाप व्यवसाय व जुगार अड्ड्यांना तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गावगुंडांना संरक्षण देण्याच्या मोबदल्यात पोलिस ठाण्याला मिळणारी प्रति महिना लाखो रुपयांची ‘एंट्री’ हा एक समाजाचा चर्चेचा विषय होऊन गेला आहे.
ही एंट्री गोळा करण्याचे (कलेक्टरचे) काम आपल्याला मिळावे यासाठी अनेकवेळा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पोलिस ठाणे प्रमुखाची आपल्यावर मर्जी जडावी व आपल्याला त्यांचा खास जवळचा म्हणून ओळखण्यात यावे यासाठी पोलिसांची अक्षरश: चढाओढ सुरू असते. परिणामी पोलिस ठाण्यात सरळ सरळ मर्जीतले व गैरमर्जीतले असे दोन गट पडल्याचे त्यांच्या बोलण्यातून अगदी सहजपणे समजून येते. पोलिस ठाण्यात न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्वसामान्यांनाही नाचविण्यात येते. वरकमाईला सोकावलेल्या या बहाद्दरांना सर्वसामान्य लोकांच्या परिस्थितीचे जराही काही देणे घेणे किंवा सोयरसूतक नसते.
लाचखोरी व खंडणीच्या घटना घडूनही वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करीत नाहीत. परिणामी हुपरी पोलिस ठाणे कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या कार्यक्षेत्रात आहे की नाही, अशी चर्चा सर्वसामान्य ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.