‘पोलीस मित्र’ ही कोल्हापूरची ओळख
By Admin | Updated: November 23, 2015 00:51 IST2015-11-23T00:45:24+5:302015-11-23T00:51:21+5:30
मनोजकुमार शर्मा : शहरात पोलीस मित्रांची भव्य रॅली; समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार

‘पोलीस मित्र’ ही कोल्हापूरची ओळख
कोल्हापूर : समाजातील एक जबाबदार घटक म्हणून पोलिसांना सक्रिय व होकारात्मक सहकार्य करणारी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना आहे. ती राज्यभर कोल्हापूरची विधायक ओळख ठरावी, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी व्यक्त केली. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या प्रेरणेतून ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरात रविवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीचा प्रारंभ अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्या हस्ते झाला. ही रॅली बिंदू चौकातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली चौक, महावीर गार्डन या ठिकाणी आली. तेथे सर्वांनी रॅलीचा समारोप करीत पोलीस मित्रांनी शहर वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डॉ. शर्मा म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यातच नव्हे तर गुन्हेगारी उघडकीस आणण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची अशी कामगिरी पोलीस मित्र पार पाडणार आहेत. त्यांना कर्तव्याबरोबरच काही प्रमाणात अधिकार देण्याबाबतही आपण प्रयत्न करू. तसेच भविष्यात पोलीस मित्र ही लोकचळवळ होईल व त्यामध्ये नजीकच्या काळात पाच हजार पोलीस मित्र सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शुभेच्छा देताना अभिनेते आनंद काळे म्हणाले, कोल्हापूरची परंपरा उज्ज्वल आहे. येथे मित्रच मित्र आहेत. कोणी पत्ता विचारला तर ठिकाण दाखविण्यासाठी स्वत:हून नागरिक तयार होतात. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळीसुद्धा मदतीला धावून येतात. या कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे काम पोलीस मित्रांकडून निश्चित होईल. युनिक आॅटोमोबाईलचे सुधर्म वाझे यांनी पोलीस मित्र हे वाहतूक विश्वाला शिस्त लावण्यासह पोलीस दलास एक जबाबदार समन्वयक म्हणून कार्यरत राहतील. सोशल मीडियाचा त्याला पूरक वापर होईल, असे मत व्यक्त केले. कोल्हापूर हॉटेल असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर यांनी पर्यटन व्यवसायाला पोलीस मित्र मोलाची मदत करतील, असा विश्वास व्यक्त केला. या रॅलीत शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, गृह उपअधीक्षक अनिल पाटील, निरीक्षक आर. आर. पाटील, धन्यकुमार गोडसे, अनिल देशमुख, अरविंद चौधरी, अमृत देशमुख, सुरेश मदने, पारस ओसवाल, अरुण चोपदार, सचिन शानबाग, सुरेश जरग, संत निरंकारी मंडळ, रोटरॅक्ट क्लब, विवेकानंद फाउंडेशन- वरणगे पाडळी, साई फौंडेशन- जाधववाडी, यिन समूह, हॉटेलमालक संघटना, राज्य सहकारी कर्मचारी संघटना, रविवार पेठ- स्वाभिमानी ग्रुप, अनिरुध्द उपासना फाउंडेशन, आदींसह ५०० पेक्षा जास्त पोलीस मित्र सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
लाखाचे बक्षीस
अनेकवेळा अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी व्यक्ती घटनास्थळी तडफडून मृत होण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे होऊन जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. त्यामुळे त्या जखमीला जीवदान मिळेल.
अशा व्यक्तींचा सत्कार करून त्यांना एक लाखापर्यंत बक्षीस देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांनी जखमींच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी केले.