ड्युटीवर गैरहजर पोलीस बडतर्फ
By Admin | Updated: May 16, 2015 00:03 IST2015-05-15T23:58:23+5:302015-05-16T00:03:06+5:30
पोलीस प्रमुखांचा दणका : ३३५ दिवस दांडी

ड्युटीवर गैरहजर पोलीस बडतर्फ
सांगली : ड्युटीवर सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी बडतर्फ केले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ माजली आहे. सलीम दस्तगीर वलांडकर असे या पोलिसाचे नाव आहे. पाच वर्षात ते तब्बल ३३५ दिवस गैरहजर राहिल्याने पोलीस प्रमुखांना ही कारवाई करावी लागली.
वलांडकर हे २४ सप्टेंबर २००८ रोजी सांगली पोलीस दलात भरती झाले आहेत. त्यांची जत पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. त्यानंतर त्यांची मुख्यालयात बदली झाली होती. तेव्हापासून ते सातत्याने ड्युटीवर गैरहजर राहात होते. पोलीसप्रमुख सावंत यांनी त्यांना अनेकदा बोलावून घेऊन, ड्युटीवर हजर राहण्याची सूचना केली होती. लेखी नोटीसही बजावण्यात आली होती. तथापि ते हजर राहिले नाहीत. गेल्या पाच वर्षात ते तब्बल ३३५ दिवस गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना खात्यातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
सहाजणांना दणका
गेल्या दीड वर्षापासून ड्युटीवर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांचा सावंत सतत आढावा घेत होते. जे गैरहजर होते, त्यांना बोलावून ड्युटीवर हजर राहण्याची सूचनाही त्यांंनी केली होती. काही जणांनी या सूचनेचे पालन केले, तर काहीजण हजर झाले नाहीत.