मुरगूड शहरात पोलिसांनी केले संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:25+5:302021-09-21T04:26:25+5:30

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा मुरगूड : किरीट सोमय्या मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये येणार होते. त्यातच शहर राष्ट्रवादीने हद्दीत त्यांना पाय ठेवू ...

Police conducted operations in Murgud city | मुरगूड शहरात पोलिसांनी केले संचलन

मुरगूड शहरात पोलिसांनी केले संचलन

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा

मुरगूड : किरीट सोमय्या मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये येणार होते. त्यातच शहर राष्ट्रवादीने हद्दीत त्यांना पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुरगूड शहरात प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. शिवाय सशस्त्र पोलिसांनी शहरातून संचलनही केले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना अगदी रात्री मध्यरात्री पहाटे पहाटे नोटिसा लागू केल्या होत्या.

सोमय्याने आरोप केलेला कारखाना मुरगूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. त्यामुळे एफआरआय दाखल करण्यासाठी सोमय्या हे सोमवारी दुपारी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये येणार होते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप केले आहेत आणि आमचा स्वाभिमान डिवचण्यासाठी आणि स्टंडबाजी करण्यासाठीच ते कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याचा आरोप मुरगूड शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन केला होता.

दोन बैठका घेऊन सोमय्या यांना कोणत्याही परिस्थितीत कारखाना कार्यस्थळ व मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला होता, त्यामुळे जर सोमय्या मुरगूडला आले असते तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शहराच्या विविध भागात सुमारे अडीचशे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात होते. जमावबंदीचा आदेश असल्याने दुपारपर्यंत दुकानेही बंद होती, तसेच शहरातून पोलिसांनी सशस्त्र संचलन केले.

फोटो ओळ

किरीट सोमय्या मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी येणार होते, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवाय शहरातून असे संचलनही केले.

Web Title: Police conducted operations in Murgud city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.