‘पोलीस’ची ‘साईनाथ’वर मात
By Admin | Updated: November 27, 2014 00:14 IST2014-11-26T23:48:51+5:302014-11-27T00:14:08+5:30
केएसए लीग फुटबॉल : शिवाजी विरुद्ध बालगोपाल लढत १-१ बरोबरीत

‘पोलीस’ची ‘साईनाथ’वर मात
कोल्हापूर : केएसए लीग फुटबॉल सामन्यात आज, बुधवारी कोल्हापूर पोलीस संघाने नवख्या साईनाथ स्पोर्टस्वर २-० अशी मात केली, तर दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेतील दुपारच्या सत्रातील पहिला सामना कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस् यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पोलीस संघाने सामन्यावर वर्चस्व ठेवले. १४व्या मिनिटास पोलीस संघाकडून सागर भोसले याने गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात साईनाथकडून प्रशांत टिपुगडे, मनोज अधिकारी, अभिजित चौगुले यांनी सामना बरोबरीत आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, अनुभवी पोलीस संघाच्या बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. पोलीस संघाकडून आघाडी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. ६४व्या मिनिटास पोलीस संघाचा सुनील घुमाई याने मैदानी गोल नोंदवीत २-० अशी आघाडी
वाढविली. पोलीसकडून रोहित ठोंबरे, निखिल साळोखे, नितीन रेडेकर, विनायक चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळ करीत सामना २-० असा एकतर्फी जिंकला.
दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ या दोन तुल्यबळ संघांत झाला. सामन्याच्या सातव्या मिनिटास बालगोपालच्या अभय संभाजी याने पहिला गोल नोंदवीत १-० अशी आघाडी घेतली. ‘शिवाजी’कडून शिवतेज खराडे, आकाश भोसले, स्वप्निल पाटील, तेजस शिंदे, राकेश कुमार, अमृत हांडे, सागर भातकांडे यांनी अनेक चाली रचल्या. मात्र, ‘बालगोपाल’च्या सजग बचावफळीने त्या परतावून लावल्या. बालगोपालकडून बबलू नाईक, जयकुमार पाटील, ऋतुराज पाटील, सचिन गायकवाड यांनी उत्कृष्ट खेळ करीत आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्धात जादा मिळालेल्या दोन मिनिटांत अर्थात ४२ व्या मिनिटाला शिवाजीकडून आकाश भोसलेच्या पासवर सागर भातकांडेने अप्रतिम गोलची नोंद करीत १-१ अशी बरोबरी केली.
उत्तरार्धात शिवाजीकडून आकाश भोसले, तेजस शिंदे, राकेशकुमार, जितेंद्र मोहन, अनिरुद्ध शिंदे, अमृत हांडे यांनी गोल करून आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. बालगोपालकडून बबलू नाईक, जयकुमार पाटील, सचिन गायकवाड रोहित कुरणे यांनी अनेक खोलवर चढाया केल्या. त्या परतावून लावताना ‘शिवाजी’चा गोलरक्षक गुरुदेवसिंग बलबीर याच्या अनुभवाचा कस लागला. त्याने बालगोपालच्या अनेक चढाया रोखल्या. अखेरपर्यंत दोन्ही संघांनी आक्रमण-प्रतिआक्रमण करीत आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही संघांना अखेरपर्यंत यश आले नाही. त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत राहिला. (प्रतिनिधी)
आजचे सामने
दुपारी २-०० वा. खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ)
दुपारी ४-०० वा. संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस्