कोल्हापुरात लाच घेताना पोलिसाला अटक
By Admin | Updated: October 9, 2014 23:05 IST2014-10-09T22:09:26+5:302014-10-09T23:05:21+5:30
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न करण्यासाठी दोन लाखांची मागणी

कोल्हापुरात लाच घेताना पोलिसाला अटक
वसगडे : गुन्ह्यात तडजोड घडवून आणण्यासाठी दोन लाखांची मागणी करून चर्चेअंती एक लाखाची लाच घेताना करवीर पोलीस ठाण्याचा नाईक संजय गोविंद जाधव (वय ४३, कोल्हापूर) याला तावडे हॉटेल चौकात बंदोबस्त असताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई आज, गुरुवारी झाली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्याला निलंबित केले. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जाधवचे नातेवाईक शामराव जगताप यांचे सलूनचे दुकान आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विनायक भाट (सध्या राहणार मुंबई) यांच्याशी हद्दीच्या वादातून जगतापांचा वाद झाला. यातूनच भाट यांनी चिडून जगताप यांना मारहाण केली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. जाधव हा करवीर पोलीस ठाण्यात सेवेत असल्याने भाट हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यास विनवणी करीत होते. त्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न करण्यासाठी दोन लाखांची मागणी जाधवने भाट यांच्याकडे केली होती. (प्रतिनिधी)