गूढ उकलताना पोलीस हतबल
By Admin | Updated: March 17, 2015 00:08 IST2015-03-16T22:52:34+5:302015-03-17T00:08:03+5:30
मारेकरी मोकाट : गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला महिना पूर्ण

गूढ उकलताना पोलीस हतबल
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याला सोमवारी एक महिना पूर्ण झाला, तरीही या घटनेचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. राज्याची संपूर्ण पोलीस यंत्रणा मारेकऱ्यांच्या शोधासाठी काम करीत असताना एक महिना उलटूनही ते सापडू शकलेले नाहीत. हत्या करूनही मारेकरी मोकाट फिरत असल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला मुंबई येथे त्यांचे निधन झाले. पानसरे यांची हत्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का? अशी शक्यता गृहित धरून त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व पातळ्यांवर माहिती घेतली. तथापि, या संदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. प्रत्यक्ष घटनास्थळावरील साक्षीदार उमा पानसरे यांच्याकडून तपास अधिकारी अंकित गोयल यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडूनही यासंदर्भात पूर्णत: माहिती प्राप्त झालेली नाही. त्यांची मनस्थिती बघून हळूहळू माहिती घेत असल्याचे गोयल यांनी सांगितले. राज्यभरातील २५ विशेष पथके याप्रकरणी मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत; परंतु हाती काहीच नसल्याने ते हतबल झाले आहेत. मुंबईहून कोल्हापुरात दाखल झालेले क्राईम ब्रँचचे पथक रिकाम्या हाताने परतले. विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी य्बोलण्यास टाळले आहे. (प्रतिनिधी)
कोणताही धागादोरा सापडलेला नाही
पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त फोन कॉल्सची चौकशी केली. सराईत गुन्हेगार, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती, नातेवाईक, आदींसह सुमारे ६०० लोकांचे जबाब घेतले. चार संशयास्पद दुचाकी जप्त केल्या; परंतु कोणताही धागादोरा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.
सांगलीत ९७ गुन्हेगारांची चौकशी
सांगली : गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी रेकॉर्डवरील ९७ गुन्हेगारांची चौकशी केली आहे. मात्र, अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
या सर्व गुन्हेगारांची नवीन छायाचित्रे व त्यांचा सध्याचा मोबाईल क्रमांक घेतला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी दिली.
दुचाकी चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.
दुचाकी चोरणारे जिल्ह्यातील ७३५ गुन्हेगार रेकॉर्डवर आहेत. तेही चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. यातील २० ते २५ जणांना रोज गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलाविले जाते.
सध्या ते काय करतात, पानसरेंची हत्या झाली त्यावेळी ते कुठे होते, त्यांच्याकडे सध्या कोणते वाहन आहे, ते चोरीतील आहे का, याची चौकशी केली जात आहे. त्यांचे सध्याचे मोबाईल क्रमांक व नवीन छायाचित्र घेतले जात आहे.
बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणे व त्याची तस्करी केल्याप्रकरणी गेल्या पाच वर्षांत १४९ गुन्हेगार रेकॉर्डवर आले आहेत. यातील ९७ गुन्हेगारांची चौकशी पूर्ण झाली आहे. उर्वरित २८ गुन्हेगार जिल्ह्याबाहेरचे व परराज्यांतील आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी तेथील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.
१९ गुन्हेगार सध्या कारागृहात आहेत. नऊ गुन्हेगार त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सध्या राहत नाहीत. त्यांचा शोध सुरू असल्याचे घनवट यांनी सांगितले.
पानसरे हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यावर आताच कोणत्याही प्रकारे मी भाष्य करू शकत नाही.
डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक.