पोलीस कोठड्याच बनताहेत मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: August 25, 2014 23:12 IST2014-08-25T23:09:47+5:302014-08-25T23:12:39+5:30
जीवांची कोंडी : अद्ययावत, सुरक्षित ठेवण्याचे गृहविभागाचे आदेश

पोलीस कोठड्याच बनताहेत मृत्यूचा सापळा
एकनाथ पाटील-कोल्हापूर --जिल्ह्णांतील बहुतांश पोलीस ठाण्यांतील कोठड्यांची दुरावस्था झाली आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे पोलीस कोठडीमध्ये आरोपींच्या मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहविभाग व पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील पोलीस ठाण्यातील कोठड्या अद्ययावत व सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्ह्णातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
एखाद्या गुन्ह्णामध्ये अटक केलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र दहा बाय बारा किंवा बारा बाय वीस रूंदी-लांबीच्या कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोठडीमध्ये रात्री-अपरात्री आरोपींना लघुशंकेसाठी छोटे स्वच्छतागृह आहे. त्याशिवाय ती खोली पूर्णत: मोकळी असते. कोणतीही वस्तू, फॅन यांची सुविधा नसते. कोठडीसमोर चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात केलेला असतो. त्याला कोठडीतील आरोपींच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. परंतु अलीकडच्या काळात पोलीस कोठडीमध्ये आरोपींच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन गृहखात्यासह पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व जिल्ह्णांतील पोलीस प्रशासनाला पोलीस ठाण्यातील कोठडी अद्ययावत आहेत की नाही, याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महासंचालकांनी पाठविलेल्या आदेशामध्ये कोठडींची पाहणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
शहरात करवीर, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र कोठडी आहे. राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये १०+१० ची छोटीसी कोठडी आहे तर लक्ष्मीपुरीमध्ये १०+१२ ची कोठडी आहे. करवीर आणि राजारामपुरीच्या कोठड्या मोठ्या आहेत. सर्व कोठडींची दुरवस्था दिसते. आरोपींनी केलेल्या लघुशंकेची दुर्गंधी, झाडलोट नसल्याने या कोठडीमध्ये आरोपींचा जीव कोंडला जात आहे.
जिल्ह्णांतील सर्व पोलीस ठाण्यांच्या कोठडींची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन केली जाणार आहे. कोठड्या अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, (पोलीस अधीक्षक)
शौचालय नाही
जिल्ह्णातील बहुतांशी पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींसाठी शौचालय नसल्याचे निदर्शनास आले आहे. अटक केलेल्या आरोपींना बाहेरील सार्वजनिक शौचालयात घेऊन जाण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
चार आरोपींचा मृत्यू
पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आरोपींच्या जिवाला धोका पोहोचेल, अशी कोणतीही वस्तू न ठेवण्याचे आदेश असताना जिल्ह्णांतील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींना झोपण्यासाठी घोंगडे, चादर, बेडशीट दिली जात आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये अरुण पांडव या आरोपीचा कोठडीमध्येच मृत्यू झाला होता. वादग्रस्त वडगाव पोलीस ठाण्यामध्ये चार वर्षांपूर्वी तिघा आरोपींनी पोलीस ठाण्यामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती.
या घटनांची धग अजूनही विझलेली नाही. तोपर्यंत वडगाव पोलिसांच्या मारहाणीत जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. अशा गंभीर घटना घडूनही कोल्हापूर पोलीस मात्र बेदखल आहेत. या कोठड्या आरोपींसाठी मृत्यूचा सापळाच बनल्याची भीती व्यक्त केली जात आहे.