पोलिसांच्या भत्त्यात सहापटींनी वाढ

By Admin | Updated: April 2, 2015 00:37 IST2015-04-02T00:24:40+5:302015-04-02T00:37:17+5:30

गृहखात्याचा निर्णय : साप्ताहिक सुटी दिवशी कामावर आल्यास वेतन

Police allowance increased by six | पोलिसांच्या भत्त्यात सहापटींनी वाढ

पोलिसांच्या भत्त्यात सहापटींनी वाढ

एकनाथ पाटील - कोल्हापूर -गेली २७ वर्षे पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना सुटीच्या दिवशी काम केल्यास ६८ रुपये भत्ता दिला जात असे. आता मात्र गृहखात्याने त्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या भत्त्यामध्ये सहापटींनी वाढ होणार आहे. प्रत्येक पोलिसाला पगारानुसार कमीत कमी ४०० व अधिकाऱ्यांना ७०० रुपये भत्ता मिळणार आहे. हक्काच्या साप्ताहिक सुटी दिवशी कामावर येणाऱ्या पोलिसांच्या श्रमांची शासनाने दखल घेतल्याची भावना पोलिस दलात व्यक्त होत आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, घरफोडी, मोटारसायकल चोरी, चेन स्नॅचिंग, हाणामाऱ्या, आदी गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३९ लाख आहे. गृहखात्याने १७०० लोकांमागे एक पोलीस अशा दोन हजार ९०० पोलिसांच्या हाती येथील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे. रोजच्या आंदोलनांबरोबरच कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांच्या बंदोबस्तामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडल्याने त्यांना साप्ताहिक सुटी बरोबर हक्काच्या रजाही घेता येत नाहीत.
पोलिसांना वर्षभरात ५२ साप्ताहिक सुट्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, जोतिबाची चैत्र यात्रा, निवडणुका, तसेच अचानक दंगल किंवा गंभीर गुन्हा घडल्यास काही सुट्या रद्दही केल्या जातात. अशा बिकट परिस्थितीत हक्काच्या साप्ताहिक सुटी दिवशी कामावर बोलावून घेतल्यास त्यांना तुटपुंजा भत्ता देऊन त्यांचे मानसिक समाधान करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने केला जात होता. यामुळे ‘भत्ता नको पण सुट्या द्या’ अशा भावना पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या होत्या; परंतु सुटी दिवशी काम करणाऱ्या पोलिसांना दिला जाणारा ६८ रुपये भत्ता अपुरा आहे. त्यामुळे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या निर्णयामुळे पोलिसांना त्यांच्या पदानुसार कमीत कमी ४०० ते ७०० रुपये भत्ता मिळणार आहे.

सुटीच्या दिवशी काम करणाऱ्या पोलिसांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय गृहखात्याने घेतल्याचे समजते. अद्याप या निर्णयाचे पत्र आम्हाला मिळालेले नाही; परंतु या निर्णयाचे कोल्हापूर पोलिसांकडून स्वागत होत आहे.
- किसन गवळी, गृह पोलीस उपअधीक्षक



शासकीय विभागात २४ तास काम करणारा पोलीस हा एकमेव विभाग आहे. साप्ताहिक सुटी दिवशी कामावर आल्यास मिळणारा भत्ता घरी सांगताना कमीपणा वाटत असे. अशी मानसिकता सर्वच पोलिसांची आहे. एक दिवसाच्या वेतनामुळे अनेक वर्षांपासूनच्या मागणीला न्याय मिळाला आहे.
- पोलीस हवालदार

Web Title: Police allowance increased by six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.