पीएन पाटील पुरवणी लेख...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:16+5:302021-01-08T05:17:16+5:30
एखादी व्यक्ती राजकारणात एक-दोन पराभव वाट्याला आले की खचून जाते. परंतु पराभव पचवूनही गेली पस्तीस वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांच्या ...

पीएन पाटील पुरवणी लेख...
एखादी व्यक्ती राजकारणात एक-दोन पराभव वाट्याला आले की खचून जाते. परंतु पराभव पचवूनही गेली पस्तीस वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांच्या नावाचा आजही दबदबा आहे, अशी व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे होत. सत्ता असो, अगर नसो, त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ कायम आहे. राजकारणात व जिल्हाच्या प्रशासनातही त्यांच्या शब्दाला वजन आहे. मी पी. एन. पाटील बोलतोय, या एका फोनमध्ये अनेक प्रश्न सोडविण्याची ताकद आहे. म्हणूनच कार्यकर्ते त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आत एक व बाहेर एक, असले राजकारण त्यांनी कधीच केले नाही. जे होणार तेच करणार म्हणून सांगणार, जे होणार नाही ते स्पष्टपणे सांगण्याचा त्यांचा स्वभाव आहे. एखाद्याला शब्द दिला तर त्यातून व्यक्तिगत कितीही अडचणी आल्या तरी तो पाळायच, ही त्यांच्या राजकारणाची धाटणी आहे.
पी. एन. पाटील हे ताठ आहेत, अशी त्यांची प्रतिमा काहींनी जाणीवपूर्वक केली आहे. परंतु या माणसाचा स्वभाव असा आहे, की ते सहजासहजी कुणालाही गळ्यात पडून घेत नाहीत. पारखून निरखून कार्यकर्त्याची निवड करतात. एकदा त्यांना वाटले की, आपला हाडाचा कार्यकर्ता आहे, मग त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत असे फारच कमी लोक असतील, की ते पी. एन. साहेब यांच्यापासून बाजूला गेलेत. काही सत्तेची संधी मिळाली नाही म्हणून हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक त्यांच्यापासून बाजूला गेले. परंतु सामान्य कार्यकर्त्याची नाळ कधीच तुटलेली नाही, त्यांनी ती तुटू दिलेली नाही. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ काँग्रेस व सामान्य माणसांशी एकनिष्ठ राहून राजकारण केले. जय-पराजय झाला तरी कधीही लोकांची नाळ तुटू दिलेली नाही. पक्षाशी इमान बाळगले, त्याची पोहोचपावती म्हणून तब्बल २० वर्षे पक्षाने जिल्हाध्यक्षपद दिले. अनेक नेते या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार अशी चर्चा होते; परंतु पी. एन. पाटील कधी कोणत्या पक्षात जाणार, अशी साधी चर्चाही होत नाही. कारण सर्वच पक्षांना माहीत आहे की, पी. एन. हे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. ही निष्ठा हीच त्यांची जनतेतील मोठी नैतिक ताकद आहे. म्हणूनही ते सत्तेत असोत अगर नसोत, लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे राहिले आहेत. लोक अकृत्रिम प्रेम करतात. त्या प्रेमाच्या, विश्वासाच्या बळावरच त्यांनी विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.
पी. एन. पाटील ही व्यक्ती म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील एक शक्ती आहे. आमदार होण्यापूर्वीच त्यांचा आमदार, मंत्र्यापेक्षा जिल्ह्यात मोठा दरारा होता व तो आजही तसुभरही कमी झालेला नाही. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे. सहकाराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे कल्याण करण्याची दृष्टी आहे. त्यांनी आतापर्यंत ज्या संस्था काढल्या, त्या उत्तम पध्दतीने चालविल्या आहेत. दिंडनेर्लीच्या फोंड्या माळावर सूतगिरणीचा प्रकल्प उभारला. तिथे सुमारे ८०० हून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले. कोल्हापूर जिल्हा बँक, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ, भोगावती साखर कारखाना, श्रीपतराव दादा बँक या संस्थांच्या माध्यमातून सुमारे दोन हजारांहून जास्त तरुणांना नोकऱ्या दिल्या. जिल्हा बँकेचा अध्यक्ष असताना सात टक्के दराने पीक कर्ज उपलब्ध करून देणारे ते देशातील पहिले अध्यक्ष होते. ते धोरण नंतर केंद्र सरकारनेही स्वीकारले. गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेने तीन लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचा पाठपुरावा पी. एन. पाटील हे गेली तीन वर्षे बँकेकडे करत होते. शेवटी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी त्यांची मागणी मान्य करून हा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्याचे सारे श्रेय पी. एन. पाटील यांच्या पाठपुराव्याचे आहे.
राजकारणात आल्यापासून गेल्या ३४ वर्षांत एकच पक्ष, एकच विचार व गांधी घराण्याला एकच नेता मानून राजकारण करण्याचे त्यांना जणू व्यसनच लागले आहे. निवडणुकीत पराभव झाला म्हणून कधी हार मानली नाही. एकदा पराभव झाला, तर पुढची पाच वर्षे लोक शोधून सापडत नाहीत. ते सातत्याने मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खात सहभागी झाले आहेत. म्हणूनच आमदार झाल्यावर काँग्रेसने मंत्रीपद देऊन त्यांच्या निष्ठेचे फळ द्यायला हवे होते, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. परंतु ती फलद्रूप झाली नाही.
ज्या संस्थांचे ते नेतृत्व करतात, त्या उत्तम पध्दतीने चालविण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. जिल्हा बँकेत ते सलग पाच वर्षे अध्यक्ष होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात (गोकुळ) गेली वीस वर्षे त्यांचीच सत्ता आहे. या काळात गोकुळने दूध उत्पादनातील देशातील एक नावाजलेला संघ अशी ओळख निर्माण केली आहे. भोगावती सहकारी साखर कारखान्याची सूत्रे त्यांच्याकडे कारखाना अडचणीत असताना आली. सभासदांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच त्यांना पूर्ण बहुमताने कारखान्याची सत्ता दिली. तिथेही त्यांनी काटेकोर व्यवहाराची शिस्त लावून कारखान्याची घडी बसवत आणली आहे. पी. एन. पाटील यांच्या राजकारणाला असा समाजकारणाचा, विकासाभिमुख दृष्टिकोनाचा पाया आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात ते गेली पस्तीस-चाळीस वर्षे पाय रोवून उभे आहेत, त्यामागे या कामाची पुण्याई आहे.
विश्वास पाटील