उपाध्यक्ष निवडीवरून पी.एन.-आवाडे खडाजंगी

By Admin | Updated: May 22, 2015 00:39 IST2015-05-22T00:34:34+5:302015-05-22T00:39:54+5:30

वातावरण तणावपूर्ण : अखेरच्याक्षणी गाताडे यांची माघार

PN-Awade Khadajungi from the Vice President's selection | उपाध्यक्ष निवडीवरून पी.एन.-आवाडे खडाजंगी

उपाध्यक्ष निवडीवरून पी.एन.-आवाडे खडाजंगी

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या उपाध्यक्षपदावरून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात गुरुवारी जोरदार खडाजंगी झाली. ‘तुम्ही म्हणजे कॉँग्रेस काय?’ असा सवाल आवाडे यांनी केल्याने पाटील चांगलेच संतापले. ‘तुम्ही पक्षासोबत आहात कधी? तुम्हाला जे काही करायचे ते करा,’ असे पाटील यांनी आवाडे यांना सुनावले.
जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदासाठी पी. एन. पाटील इच्छुक होते; पण राष्ट्रवादी कॉँग्रेसने अध्यक्षपदावर दावा केल्याने पाटील यांचे नाव मागे पडले. याबाबत गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता शाहूपुरी येथील श्रीपतरावदादा बॅँकेत दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. अध्यक्षपदी आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाल्यानंतर उपाध्यक्षपदावर कॉँग्रेसकडून विलास गाताडे यांच्या नावासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आग्रह धरला; पण पी. एन. पाटील यांनी गडहिंग्लजचे विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांचे नाव निश्चित केले. येथेच पाटील व आवाडे यांच्यात वादाची ठिणगी पडली. विलास गाताडे यांचा अर्ज दाखल करणार, असे सांगत प्रकाश आवाडे श्रीपतरावदादा बॅँकेतून बाहेर पडले. जिल्हा बॅँकेत आल्यानंतर आवाडे यांनी गाताडे यांना उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले. तिथे आमदार महादेवराव महाडिक यांनी आवाडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ‘तुम्ही म्हणजे कॉँग्रेस आहे काय?’ असा सवाल आवाडे यांनी पी. एन. पाटील यांना केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी गाताडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा वातावरण गरम झाले. हसन मुश्रीफ, आमदार महाडिक यांनी आवाडे यांची समजूत काढल्यानंतर गाताडे यांनी अर्ज मागे घेतला.

Web Title: PN-Awade Khadajungi from the Vice President's selection