‘कायम’ शब्द काढण्यासाठी याचिका
By Admin | Updated: July 28, 2014 00:14 IST2014-07-28T00:10:18+5:302014-07-28T00:14:23+5:30
‘एमसा’ मेळावा : संस्थाचालक, शिक्षकांचा एकमुखी निर्णय

‘कायम’ शब्द काढण्यासाठी याचिका
कोल्हापूर : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील ‘कायम’ शब्द वगळण्यासाठी १६ आॅगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय संस्थाचालक, शिक्षकांनी आज, रविवारी इंग्लिश मेडियम स्कूल्स् असोसिएशनच्या (एमसा) मेळाव्यात घेतला.
येथील विद्याभवनमध्ये ‘एमसा’तर्फे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे संस्था अध्यक्ष, सचिव, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संयुक्तपणे मेळावा झाला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे, तर अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रशांत भावके होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, मोफत व सक्तीचा शिक्षण हक्ककायदा २००९ नुसार सर्व निकष पूर्ण करणाऱ्या व शासकीय अनुदानाची मागणी करणाऱ्या अशा सर्व शाळांना कायद्यानुसार शासनाने अनुदान दिले पाहिजे. इंग्रजी माध्यमाची शाळा चालविताना संस्था चालक, शिक्षक यांची सध्या परवड होत आहे. ते लक्षात घेऊन या शाळांमधील ‘कायम’ शब्द काढण्यासह त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन.
मेळाव्यात ‘कायम’ शब्द वगळण्यासाठी दि. १६ आॅगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला. त्यासह २५ टक्के आरक्षणानुसार केलेल्या प्रवेश निश्चितीचे शुल्क तातडीने शासनाकडून मिळावे. स्वयं अर्थसहाय्यित शाळांचे तत्त्व बंद करून बृहृत आराखडा तयार करावा. शिक्षकांना वेतन आणि वेतनेत्तर अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले, असल्याची माहिती ‘एमसा’ चे अध्यक्ष महेश पोळ यांनी दिली.
मेळाव्यात ‘एमसा’तर्फे आमदार पाटील यांचा प्रा. माणिकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रा. अनिता पाटील, प्राचार्य व्ही. आर. भोसले, के. डी. पाटील, प्रा. जाधव, रावसाहेब पाटील, तानाजी पाटील, आदींची भाषणे झाली. जिल्ह्यातील ४७ इंग्रजी शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, आदी उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष महेश पोळ यांनी मेळावा आयोजनाचा उद्देश सांगितला. गणेश आयकुडे यांनी स्वागत केले. एम. आर. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कपिलेश्वर महादेव मंदिर