(सीडीसाठीचा नियोजित विषय) रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गाचे भूसंपादन दोन महिन्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:21+5:302021-01-13T05:04:21+5:30
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रमार्गे कोकणला विदर्भ जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या नव्या महामार्गांतर्गत रत्नागिरी ते कोल्हापूर या १३४ ...

(सीडीसाठीचा नियोजित विषय) रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गाचे भूसंपादन दोन महिन्यांत
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रमार्गे कोकणला विदर्भ जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या नव्या महामार्गांतर्गत रत्नागिरी ते कोल्हापूर या १३४ किलोमीटरच्या मार्गाचे भूसंपादन येत्या दोन महिन्यांत सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जानेवारीला गॅझेट प्रसिद्धीस देऊन २५ जानेवारीपर्यंत हरकतीसाठी मुदत दिली आहे. त्यामुळे गेली १२ वर्षे रखडलेल्या या रस्ते प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
नागपूर ते रत्नागिरी असा ५४८ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग व्हावा अशी मागणी २००९ पासून होत आहे; पण मार्च २०१३ मध्ये त्याची अधिसूचना जारी झाली आणि खऱ्या अर्थाने राज्यमार्गाचे रूपांतर चौपदी महामार्गात करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले. तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी एमआयडीसी नागपूर असा पहिला टप्पा; तर सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, टिंकपाली, रत्नागिरी असा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने २०१५ मध्ये यासाठी १५०० कोटींच्या निधीचीही तरतूद झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे काम बऱ्यापैकी सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचेही काम मिरजपर्यंत सुरू आहे. सांगली ते कोल्हापूर हा मार्ग सुप्रीम या खासगी कंपनीकडून तयार करून घेतला आहे. पण कोल्हापूर हद्दीतील चोकाक ते रत्नागिरी हे काम अजून भूसंपादनातच अडकले आहे. यापूर्वी दोन वेळा भूसंपादनास सुरुवात झाली, पण कंपनीकडून योग्य मोबदला दिला जात नसल्याने शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. आता पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गॅझेट प्रसिद्धीस देऊन भूसंपादनास काही हरकत असल्यास कळवावे, अन्यथा काम सुरू केले जाईल असे कळवले आहे. त्यामुळे दीड वर्ष विस्मरणात गेलेला हा रस्ते प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.
चौकट ०१
या गावातून जाणार महामार्ग
कोल्हापुरातून रत्नागिरीला जाणारा मार्ग शहरातून प्रस्तावित होता; पण शहरात रस्ता चौपदरीकरणाला मर्यादा असल्याने चोकाक येथून ते शिये, केर्लेमार्गे वाघबीळ, पन्हाळा, बांबवडे, मलकापूर, आंबा, साखरपा, रत्नागिरी असा मार्ग निश्चित केला. हा १३४ किलोमीटरचा मार्ग आहे.
चौकट ०२
म्हणून होतोय विरोध
हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी या चार तालुक्यांतून नवीन महामार्ग जाणार आहे. या मार्गातर्गत येणाऱ्या जमिनी या पिकाऊ असल्याने त्याचा मोबदला योग्य मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हातकणंगले व करवीरमधील शेतजमीन व शाहूवाडीतील शेतजमीन यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर फरक आहे. प्राधिकरणाकडून वेगवेगळा दर आकारण्याचे धोरण ठेवल्यानेच आतापर्यंत भूसंपादनाला विरोध झाला आहे.
प्रतिक्रीया
रत्नागिरी ते कोल्हापूर या चारपदरी महामार्गासाठी पुन्हा एकदा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आल्याने कार्यवाही सुरू केली आहे. दिलेल्या वेळेत हरकती देऊन सहकार्य केल्यास या रत्याचे काम सुरू होईल.
व्ही. एन. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण