विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा करा
By Admin | Updated: April 3, 2015 23:56 IST2015-04-03T22:47:37+5:302015-04-03T23:56:39+5:30
व्यापारी, रहिवाशांचा सूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण; सूक्ष्म सर्वेक्षणानंतर पुन्हा बैठक होणार

विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा करा
कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा चांगला आहे; परंतु आम्हाला तुम्ही पर्यायी जागा कुठे देणार? जागेचा मोबदला किती मिळणार? याबाबत कोणतेच स्पष्टीकरण नसताना आराखड्याची घाई कशाला? असा सवाल व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांना शुक्रवारी विचारला. आम्हाला विश्वासात घेऊनच याबाबतचा अंतिम आराखडा करा, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हा प्रारूप आराखडा असून तो अंतिम नाही. याबाबत सूक्ष्म सर्वेक्षणानंतर पुन्हा संबंधितांची बैठक घेऊ, असे आश्वासन महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले.महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये अंबाबाई मंदिराच्या परिसरातील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्यासाठी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे महापालिकेतर्फे सादरीकरण झाले. नेत्रदीप सरनोबत यांनी २५५ कोटी रुपयांच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिर परिसराबरोबरच रंकाळा विकास याबाबत आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेली माहिती दिली. तसेच विकासाच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ हायस्कूल व परिसरातील व्यापारी, रहिवाशांचे पुनर्वसन करावे, असे या प्रस्तावात आहे. आराखड्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या मिळकतदारांचे पुनर्वसन होणार असल्याचे सांगून याबाबत व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी सूचना मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले.राजाभाऊ जोशी यांनी, आम्हाला कुठे जागा देणार हे स्पष्ट केलेले नाही. ते स्पष्ट झाल्यावरच या आराखड्यावर बोलणे योग्य होईल, असे सांगितले. जागेचा मोबदला किती व जागा कुठे देणार या गोष्टी स्पष्ट होणार नसतील तर आराखडा करून आमची कुचंबणा कशाला करता? अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली.अजित ठाणेकर म्हणाले, या परिसरातील व्यापारी व रहिवाशांचा उदरनिर्वाह मंदिरावरच अवलंबून आहे. पुनर्वसनामध्ये याचा विचार होणे गरजेचे आहे. अशोक देसाई यांनी शहरात अकरा मजली इमारती उभ्या राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पश्चिमेला इमारती उभारल्यास किरणोत्सवात अडसर निर्माण होऊ शकतो. याबाबत महापालिकेने काही विचार केला आहे का? अशी विचारणा केली.
महेश जाधव म्हणाले, फेरफार करून सुधारित आराखडा करतेवेळी व्यापारी, रहिवाशी यांना एकत्रित करून सर्वसंमतीनेच आराखडा करावा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आयुक्तांबरोबर चर्चा करून प्रशासनाने समिती नेमावी. यावेळी नगरसेवक आर. डी. पाटील, राजू मेवेकरी, विनायक रेवणकर, आदींनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)