बिबट्याला मारून नखे लांबविली
By Admin | Updated: August 19, 2014 00:38 IST2014-08-19T00:37:52+5:302014-08-19T00:38:20+5:30
पेंडखळे येथील घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

बिबट्याला मारून नखे लांबविली
राजापूर : सुमारे पाच वर्षीय बिबट्याची हत्या करून त्याची नखे चोरल्याची घटना तालुक्यातील पेंडखळे सतीचे रान परिसरात घडली असून, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. राजापूर तालुक्यात प्रथमच अशी घटना घडली असून, राजापूर वनविभागाने अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साधारणत: आठ-दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली असून, यामध्ये मृत झालेला बिबट्या मादी आहे. ती पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होती. पेंडखळे गावात जंगलमय परिसर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये सतीचे रान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत बिबट्या मृतावस्थेत आढळला. ग्रामस्थांनी राजापूर वनविभागाला माहिती देताच राजापूरचे वनअधिकारी गुरव घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तोवर रत्नागिरी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अशोक लाड हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तेथे पोहोचले.
मृतावस्थेत आढळलेली पाच वर्षीय मादी बिबट्या विद्रुप झाली होती. चारही पाय तोडून नखे गायब झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले. संपूर्ण शरीर कुजल्यामुळे तिचे विच्छेदन करताना अवयव तुटत होते. तशा स्थितीत डॉक्टर्सनी बिबट्याचे विच्छेदन पार पडले. हत्या केल्यानंतर बिबट्याचे चारही पाय तोडण्यात आले आणि शिकाऱ्याने नखे चोरून नेली.
पाच वर्षांपूर्वी पेंडखळे भू परिसरात एक मोठा नर बिबट्या फासकीत अडकून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. वनविभागाने अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध वनजीवी संरक्षक अधिनियम १९७२ च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत राजापूर पोलीस ठाण्याला माहितीही देण्यात आली असून, बिबट्याची नखे चोरून नेणाऱ्या अज्ञात शिकारी व्यक्तीचा कसून शोध घेण्याचे काम सुरू आहे. विच्छेदनानंतर बिबट्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
मृत बिबट्याची सर्व नखे चोरण्यात आली आहेत. मात्र, बिबट्याच्या शरीरावर गोळी लागल्याच्या किंवा फासकीत अडकल्याच्या कसल्याही
खुणा नव्हत्या. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल.
- अशोक लाड, रत्नागिरी वनक्षेत्रपाल