कार्यक्रमपत्रिकेत ‘सौ’ला स्थान
By Admin | Updated: March 13, 2015 23:58 IST2015-03-13T23:38:13+5:302015-03-13T23:58:38+5:30
जोतिबा परिवर्तन : लग्न, वास्तुशांती आमंत्रणासाठी महिलांची नावे

कार्यक्रमपत्रिकेत ‘सौ’ला स्थान
दत्तात्रय घडेल- जोतिबा लग्न, वास्तुशांती किंवा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, कार्यक्रम पत्रिकेवर पुरुषप्रधान छाप पाहायला मिळते. महिलांना फारसे स्थान मिळत नाही. लग्नपत्रिकेत महिलांचे नाव फक्त ‘सौ’ पुरतेच असते. संपूर्ण पुरुषांचे नाव लिहिण्याची परंपरा आजही पाहायला मिळते; पण याला अपवाद जोतिबा डोंगर येथील लग्नसोहळा व मौजीबंधन पत्रिकेतून दिसून आला. लग्नपत्रिकेवर संपूर्ण महिलांचे नाव लिहून पत्रिका वाटण्यात आल्या. प्रथम पत्नीचे नाव, नंतर पतीचे नाव लिहिण्यात आले. हा नवपरिवर्तनवादी विचार स्तुत्य बदल म्हणावा लागेल. जोतिबा डोंगर येथील सुनील शिंगे यांनी आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेमध्ये महिलांना पहिले स्थान देऊन पत्रिका वाटल्या. विनोद चिखलकर यांनी आपल्या मुलाच्या मौजीबंधन पत्रिकेवरही महिलांचे प्रथम नाव व नंतर पतीचे नाव लिहून महिला वर्गाला प्रतिष्ठा मिळवून दिली. शासनाने शाळेच्या दाखल्यावर, रेशनकार्डावर आईचे, पत्नीचे नाव प्रथम देण्याचा आदेश काढला आहे. आता लोकांमधूनच महिलांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे.शाहू वैदिक विद्यालयाने मंदिरामध्ये फटाके उडवू नये, या आवाहनालाही प्रतिसाद देऊन मंगलाष्टका झाल्यानंतर फटाके वाजविले नाहीत. या त्यांच्या कार्याचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
सुमारे ७० पालकांनी मुलांचे मौजीबंधन सामुदायिकरीत्या करून वेळ, पैसा, श्रम यांची बचत केली. गावातील उपाध्ये, गावकर, जोतिबा पुजारी, भक्तगण, चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामस्थ यांनी एकत्रित हा निर्णय घेतला. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा या आधुनिक काळाचा विचार करून साजऱ्या केल्या पाहिजेत, हा नवा संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहे.
लग्न सोहळ्यातील अवाढव्य खर्चावर मर्यादा
लग्न सोहळ्यामध्येही आता होणाऱ्या अवाढव्य खर्चावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. लग्नाच्या वरातीमध्ये होणाऱ्या डॉल्बीवरील खर्चाला फाटा देत येथील सोमनाथ ढोली यांनी भावाच्या लग्नाच्या वरातीमध्ये भावगीत, भक्तिगीत कार्यक्रम सादर करून आदर्श निर्माण केला आहे.