‘टू के प्रिंट’ तंत्रज्ञानाने सजलेला 'पिंजरा' प्रदर्शित

By Admin | Updated: March 19, 2016 00:24 IST2016-03-19T00:22:14+5:302016-03-19T00:24:50+5:30

प्रेक्षकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद : ४४ वर्षांनंतरही मास्तरांची जादू कायम

'Pinjara' displaying 'Too prints' technically decorated | ‘टू के प्रिंट’ तंत्रज्ञानाने सजलेला 'पिंजरा' प्रदर्शित

‘टू के प्रिंट’ तंत्रज्ञानाने सजलेला 'पिंजरा' प्रदर्शित

कोल्हापूर : अभिजात कलाकृती अनेक वर्षांनंतरही टवटवीत आणि स्मरणात राहतात. ७० च्या दशकात आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आता नव्या ‘टू के प्रिंट’च्या साजात प्रदर्शित झालेल्या ‘पिंजरा’ चित्रपटाला शुक्रवारी कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, संध्या यांचा दमदार अभिनय, राम कदम यांचे बहारदार संगीत, जगदिश खेबुडकर यांची गीते आणि व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाने सजलेला ‘पिंजरा’ म्हणजे मराठी चिपटसृष्टीतील अभिजात कलाकृती. काळ बदलला तरी या कलाकृतीचे महत्त्व कमी झाले नाही. त्यामुळेच व्ही. शांताराम प्रॉडक्शनतर्फे तांत्रिक बदल आणि डिजिटलायझेशन करून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. ४४ वर्षांनंतरही मास्तरांची जादू कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ३१ मार्च १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या मूळ प्रिंटचे अद्ययावत अशा ‘टू के प्रिंट’मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आॅडिओ, कलर ग्रेडिंग, आॅडिओ रिस्टोरेशन आदी विविध प्रक्रिया करून चित्रपटाचे ध्वनी, चित्र आणि प्रिंटमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दृश्यदर्जात सुधारणा झाली आहे. कलर करेक्शन प्रक्रियेमुळे रंगसंगतीही अधिक आकर्षक झाली आहे. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. खेबुडकर यांचे आशयपूर्ण शब्द आणि राम कदम यांच्या अस्सल मराठमोळ्या चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी अद्ययावत वाद्यवृंदासह आधुनिक पार्श्वसंगीताचा नवा मुलामा दिला आहे. डॉल्बी साऊंड सिस्टीममुळे सुस्पष्टता आली आहे.


मराठी चित्रपट-सृष्टीतील ‘माईलस्टोन’ ठरलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाची जादू आज नव्याने अनुभवायला मिळाली. मराठी भाषेला प्राधान्य म्हणून मी आज हा चित्रपट पाहिला.
- सारिका बनगे, कोल्हापूर


मी हा चित्रपट तब्बल २२ वेळा पाहिला आहे; पण आज नव्या ढंगात पाहिल्याचा आनंद काही औरच होता. मराठीतल्या अनेक दर्जेदार कलाकृतींवरही असे प्रयोग व्हायला हवेत. पिंजरा पाहण्यासाठी नेर्ले (ता. शाहूवाडी) येथून आम्ही ४४ जण कोल्हापूरला आलो होतो.
- बी. एन. पाटील, नेर्ले, ता. शाहूवाडी

Web Title: 'Pinjara' displaying 'Too prints' technically decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.