विमान बिल्डिंगमधील अभ्यासिका सुरू
By Admin | Updated: November 14, 2014 23:57 IST2014-11-14T23:56:10+5:302014-11-14T23:57:39+5:30
कुलगुरूंचे आदेश : प्रशासनाची कार्यवाही

विमान बिल्डिंगमधील अभ्यासिका सुरू
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विमान बिल्डिंगमधील अभ्यासिका कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी दिलेल्या आदेशानंतर पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे महाविद्यालयीन, विद्यापीठातील, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव श्वेता परुळेकर हिने पाठपुरावा केला होता.
याबाबत तिने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विमान बिल्डिंग अभ्यासिकेसाठी वापरली जाते. या ठिकाणी विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचे ओळखपत्र काढल्यास त्यांना येथे अभ्यासाला बसण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी याठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यास मनाई केली जात होती. शिवाय त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. मात्र, भीतीपोटी त्याबाबत प्रतिक्रिया देण्यास विद्यार्थी पुढे येत नाहीत. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांबाबत होत असलेला हा प्रकार गंभीर आहे. तरी याची चौकशी करून तातडीने विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका खुली करावी. त्यावर कुलगुरू डॉ. पवार यांनी संबंधित विभागप्रमुखांना याबाबत सूचना देऊन विद्यार्थ्यांसाठी विमान बिल्डिंगमधील ही अभ्यासिका पूर्ववत सुरू केली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यवाहीने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)