‘स्वीकृत नगरसेवक’ निवडीचे त्रांगडे

By Admin | Updated: January 13, 2016 01:10 IST2016-01-13T00:38:23+5:302016-01-13T01:10:59+5:30

महापालिका : संस्था पदाधिकारीची अट; संभ्रमामुळे राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले

A 'pick up councilor' | ‘स्वीकृत नगरसेवक’ निवडीचे त्रांगडे

‘स्वीकृत नगरसेवक’ निवडीचे त्रांगडे

कोल्हापूर : महानगरपालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात येऊन दोन महिने होत आले तरी ‘स्वीकृत नगरसेवक’पदाचे त्रांगडे कायम आहे. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी व्यक्ती कोणत्या तरी संस्थेची पदाधिकारी असावी लागते, परंतु कोणत्या संस्थेचे पदाधिकारी असावे याबाबत स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे ही निवड रखडली आहे. दरम्यान, मनपा नगरसचिव विभागाने राज्य सरकारकडे अधिक स्पष्टीकरण मागविले असून ते येत्या दोन दिवसांत येईल, असे सांगण्यात आले.
१५ नोव्हेंबरला महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आले. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडी झाल्या, परंतु स्थायी, परिवहन, महिला व बालकल्याण, प्राथमिक शिक्षण मंडळ आदी समितीचे सदस्य आणि सभापतींच्या निवडी विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेत लटकल्या. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीही त्यात अडकल्या.
आता ‘स्वीकृत नगरसेवक’पदाची निवडवगळता अन्य सर्व समित्यांच्या सदस्य निवडीही २० जानेवारीच्या महासभेत होणार आहे; परंतु ‘स्वीकृत नगरसेवक’पदाची निवड ही वादात अडकली आहे. डॉक्टर, वकील, निवृत्त प्राध्यापक किंवा निवृत्त मुख्याध्यापक, निवृत्त मनपा सहायक आयुक्त, उपायुक्त, आयुक्त याव्यतिरिक्त कोणत्याही संस्थेचा पदाधिकारी असलेली व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकते. महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन ही सर्व प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली.
त्यानंतरही काही शंका गटनेत्यांनी उपस्थित करून लेखी उत्तर मागितले. व्यक्ती कोणत्या संस्थेची पदाधिकारी असावी आणि संबंधित संस्थेचा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या उतारा (पी.टी.आर.) आवश्यक आहे का, असे दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. ‘पीटीआर’बाबत खुलासा करण्यात आला होता, तो मान्यही करण्यात आला होता परंतु बैठकीनंतर भाजप व ताराराणी आघाडीच्या गटनेत्यांनी त्याला हरकत घेतली. त्यामुळे हे त्रांगडे निर्माण झाले आहे.
नगरसचिव विभागाने मागवलेले मार्गदर्शनही अद्याप आलेले नाही. त्यामुळे या निवडी सध्या अधांतरीच राहिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: A 'pick up councilor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.