‘लोकमत’च्यावतीने उद्यापासून छायाचित्र प्रदर्शन
By Admin | Updated: August 18, 2015 00:57 IST2015-08-18T00:57:21+5:302015-08-18T00:57:21+5:30
जागतिक छायाचित्र दिन : ज्येष्ठ छायाचित्रकारांचा विशेष गौरव; हौशी व व्यावसायिक गटात होणार छायाचित्र स्पर्धा

‘लोकमत’च्यावतीने उद्यापासून छायाचित्र प्रदर्शन
कोल्हापूर : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ‘लोकमत’च्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर, शेखर वाली व बापू मकानदार यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
शाहू स्मारक भवनच्या कलादालनात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या उद्घाटन समारंभास ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मूळचे कागलचे असलेले ज्येष्ठ छायाचित्रकार बापू मकानदार यांनी व्यवसायासाठी कोल्हापूर गाठले. त्यांनी विविध स्टुडिओंमध्ये कामाचा अनुभव घेत आझाद चौकात ‘स्टुडिओ मकानदार’ हा स्वत:चा स्टुडिओ सुरू केला.
त्यानंतर त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. त्याकाळी ‘पुढारी’, ‘समाज’, ‘सत्यवादी’ अशा विविध दैनिकांना ते छायाचित्रे देत. राष्ट्रीय तालीम संघातर्फे त्यांना कुस्ती स्पर्धांची छायाचित्रे काढण्यासाठी आवर्जून बोलावले जायचे. या क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रेस क्लबतर्फे त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वयाच्या पंचाहत्तरीतही ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.
वयाची शहात्तरी गाठलेले ज्येष्ठ छायाचित्रकार शेखर वाली यांनीही वयाच्या १८ व्या वर्षी छायाचित्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी ‘पुढारी’, ‘सकाळ’, ‘केसरी’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ अशा विविध दैनिकांना ते छायाचित्रे देत. धुक्याची सुंदर छायाचित्रे काढण्यात त्यांचा हातखंडा आहे शिवाय व्यक्तिचित्रांतही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या छायाचित्राला सन १९७२ रोजी आंतरराष्ट्रीय पारितोषिकही मिळाले आहे. आता वयोमानामुळे त्यांनी निवृत्ती घेतली असली तरी या क्षेत्रात ते नवी पिढी घडविण्याचे काम करीत आहेत.
ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना बालपणापासूनच छायाचित्रणाची आवड होती. त्यांनी सन १९७१ पासून ‘व्यावसायिक छायाचित्रकार’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सन १९८६ मध्ये त्यांनी ग्रामीण पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. काही वर्षे ‘तरुण भारत’मध्ये छायाचित्रकार म्हणून काम केल्यानंतर ‘स्वतंत्र छायाचित्रकार’ म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. राजकीय व सामाजिक घडामोडी टिपण्यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या ते महापालिकेच्या छायाचित्रकार पॅनेलवर कार्यरत आहेत.
या तीनही छायाचित्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे. या छायाचित्र प्रदर्शनासाठी ‘ग्लोबल-लोकल टुरिझम’ आणि ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ असे दोन विषय देण्यात आले आहेत.
या प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम चेतना अपंगमती विकास संस्थेला देण्यात येणार आहे; तरी अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत सामाजिक कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
छायाचित्र स्पर्धेस उदंड प्रतिसाद; आज दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारणार
छायाचित्र स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज, मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत छायाचित्रे स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे अद्याप ज्या हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे जमा केलेली नाहीत, त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हौशी आणि व्यावसायिक अशा दोन गटांत होणार असून, दोन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्याला कॅमेरा आणि तीन हजार रुपयांचे गिफ्ट व्हौचर, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक विजेत्याला अनुक्रमे दोन हजार रुपये व एक हजार रुपयांचे गिफ्ट व्हौचर पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.