जिल्ह्यातील ‘शेकाप’चे बुरुज ढासळू लागले
By Admin | Updated: January 19, 2017 23:59 IST2017-01-19T23:59:00+5:302017-01-19T23:59:00+5:30
राज्यस्तरावर पक्षाला ‘भरती’ : एकापाठोपाठ एक कार्यकर्त्याकडून पक्षाला सोडचिठ्ठी

जिल्ह्यातील ‘शेकाप’चे बुरुज ढासळू लागले
प्रवीण देसाई-- कोल्हापूर --एकेकाळी कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रावर हुकुमत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जिल्ह्यातील बुरुज ढासळू लागले आहेत. राजेंद्र सूर्यवंशी, शामराव सूर्यवंशी, दिगंबर लोहार, निवास लाड यांच्यासारख्या शिलेदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. एका बाजूला राज्यस्तरावर प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या मोठ्या कार्यकर्त्यांची ‘भरती’ सुरू असताना कोल्हापूरच्या बालेकिल्ल्यात ‘ओहोटी’लागल्याचे चित्र आहे.
‘सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांचा पक्ष’ म्हणून उदयास आलेल्या शेतकरी कामगार पक्षाने कायम सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. परिणामी हा पक्ष बघता-बघता स्वातंत्र्योत्तर काळात निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात विस्तारला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण यांसह अन्य ठिकाणी या पक्षाची अनेक दशके हुकुमत होती. कोल्हापूर तर या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पक्षाचा आता जिल्ह्यात एकही आमदार राहिलेला नाही. कठीण परिस्थितीतही सध्या माजी आमदार संपतराव पवार-पाटील हे जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा पक्ष टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. तरीही या पक्षाचे एकेक बुरुज ढासळू लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शेका पक्षाचे कार्यकर्ते व शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी व त्यांचे बंधू करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी पक्षाला रामराम करून कॉँग्रेसची कास धरली आहे. तसेच पक्षाचे खजानिस निवास लाड यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच शहरातील क्रियाशील कार्यकर्ते व शहर सरचिटणीस दिगंबर लोहार यांनीही पक्षाचा राजीनामा देऊन ‘बळिराजा पार्टी’ची स्थापना केली आहे. ते या पक्षाचे संस्थापक-महासचिव आहेत. प्रत्येकाचा पक्षातून बाहेर पडण्याचा उद्देश वेगळा असला तरी पक्षनेतृत्वाचे धोरण यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
मुलुखमैदान तोफ असलेले संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच पुण्यात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शेका पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रवेशाच्या माध्यमातून राज्यस्तरावर ‘भरती’ सुुरू असताना कोल्हापुरात मात्र पक्षाला ‘ओहोटी’ लागल्याचे दिसत आहे.
दिग्गजांची पक्षविस्तारात मोलाची भूमिका
भाऊसाहेब महागावकर, दाजिबा देसाई, विजयमाला राणीसरकार, आदींनी लोकसभेत, तर त्र्यंबकराव कारखानीस, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंदराव कलिकते, तुकाराम कोलेकर, संपतराव पवार-पाटील, आदी दिग्गजांनी विविध मतदारसंघांतून विधानसभेत प्रतिनिधित्व करत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आहेत. माजी महापौर नानासाहेब यादव, माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, संभाजीराव चव्हाण, आनंदराव साळोखे, प्रा. विष्णुपंत इंगवले आदींनी शहरात पक्षसंघटना विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली.