टाकाळा खणीत कचऱ्याला विरोध, हायकोर्टात याचिका
By Admin | Updated: December 9, 2014 23:54 IST2014-12-09T23:31:19+5:302014-12-09T23:54:38+5:30
कचऱ्याचा प्रश्न : ११ तारखेला सुनावणी

टाकाळा खणीत कचऱ्याला विरोध, हायकोर्टात याचिका
कोल्हापूर : टाकाळा खणीत कचरा टाकण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याबाबत न्यायालयात गुरुवारी (दि. ११) सुनावणी होणार आहे. टाकाळा खणीकडे शहराची कचऱ्याच्या प्रश्नातून मुक्तीकडे एक पाऊल म्हणून पाहिले जात; पण टाकाळा खणीत कचरा टाकण्यास न्यायालयाकडून मज्जाव झाल्यास शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
सध्या शहरातील कचरा टाकायचा कुठे, हा प्रशासकीय यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. कचरा उठावाची मोठी यंत्रणा मनपाकडे आहे. झूम प्रकल्पात क्षमतेच्या चारपट कचरा टाकला आहे. कचरा टाकण्यासाठी दुसरी जागाच नसल्याने कचरा-कोंडाळे वाहत आहेत. टाकाळा खणीत झूममधील कचरा हटविल्यानंतर याठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. मात्र, टाकाळा खण कचरा टाकण्यास योग्य पद्धतीने तयार होण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्च २०१५नंतरच शहरातील कचरा शास्त्रीय पद्धतीने निराकरण होण्यास सुरुवात होणार आहे.
राजारामपुरी परिसरातील टाकाळा खणीत ‘लँडफिल्ड साईट डेव्हलपिंग’ (कचरा टाकण्याची शास्त्रीय जागा) तयार करण्याचे काम सुरू आहे. झूम प्रकल्पातील कचऱ्याची चाळण करून राहिलेल्या कचऱ्याचे घटक (इनर्ट मटेरिअल) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निकषांनुसारच या खणीत टाकले जाणार आहेत. खणीचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मात्र, टाकाळा खणीशेजारी शाळा, हॉस्पिटल व लोकवस्ती असल्याने हा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी करणारी याचिका परिसरातील नागरिकांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. टाकाळा खणीबाबत न्यायालयात सकारात्मक निर्णय न झाल्यास महापालिकेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)