पेठांच्या दाट वस्तीत सामान्य, नोकरदार वर्गच निर्णयक
By Admin | Updated: October 8, 2014 21:48 IST2014-10-08T00:37:52+5:302014-10-08T21:48:44+5:30
पुनर्रचनेचा फायदा शिवसेनेलाच : आदेश न जुमानता स्वत:ला पटेल त्यालाच मतदान करण्याचे कौशल्य

पेठांच्या दाट वस्तीत सामान्य, नोकरदार वर्गच निर्णयक
भारत चव्हाण -कोल्हापूर -पुरोगामित्वाचा चेहरा असणाऱ्या या मतदारसंघात एकीकडे झोपडपट्टीसारखा भाग, तर दुसरीकडे बंगले, कॉलनीसारखा पॉश भाग. एकीकडे सुशिक्षित, तर दुसरीकडे अशिक्षित मतदार. एकीकडे कष्टकऱ्यांची संख्या अधिक, तर दुसरीकडे व्यापारी, उद्योजक, कारखानदार, नोकरदारांचाही रहिवास असा इतिहास-भूगोल असलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. काँग्रेसचे दोन अपवाद वगळता १९५७ पासून
शेकाप, संयुक्त महाराष्ट्र समिती, जनता पक्ष, शिवसेना अशा विरोधी पक्षांचे उमेदवार येथून विजयी झाले आहेत.
या मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. शहराच्या अग्नेय दिशेपासून पश्चिम भागातील २६ प्रभाग हे कोल्हापूर दक्षिण भागाला जोडले गेले, तर पूर्वीचा करवीर मतदारसंघातील कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, राजारामपुरी, शाहूपुरी हा भाग कोल्हापूर उत्तर मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. पुनर्रचित मतदारसंघाचा खरा फायदा शिवसेनेला झाला. मतदारसंघ शहरी असल्याने कोणी आदेश दिला तरी जे स्वत:ला पटते तेच मतदार करत असतात.
महापालिकेत जरी काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असली आणि या पक्षाच्या नेत्यांनी काही विकासाभिमुख योजना शहरात आणल्या असल्या तरीही टोल, एलबीटीच्या मुद्द्यावर नाराज आहे.
निकाल फिरवणारा भाग
उत्तर मतदारसंघात कसबा बावडा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ या भागात दाटवस्तीने लोक राहत असल्यामुळे हा भागच उमेदवाराला विजयाचा गुलाल लावत आला आहे. गत निवडणुकीत या भागांतील मतदारांनी शिवसेनेची पाठराखण केली, तर लोकसभेवेळी राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे येथे धडक मारण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे.
मराठा समाजाचे अंदाजे मतदान १ ते १ लाख १० हजार
मुस्लिम समाजाचे अंदाजे मतदान ३० ते ३२ हजार
दलित समाजाचे मतदान २२ ते २५ हजार
ब्राह्मण समाजाचे मतदान १८ ते २० हजार
गुजराती व राजस्थानी मतदान १७ ते १८ हजार
इतर ओबीसी मतदान अंदाजे ६० ते ६५ हजार