स्थायीसह परिवहन सदस्य अज्ञातवासात
By Admin | Updated: January 2, 2015 00:07 IST2015-01-01T23:58:51+5:302015-01-02T00:07:27+5:30
निवडणूक अटळ : हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा; आजच्या सभेत होणार निवड

स्थायीसह परिवहन सदस्य अज्ञातवासात
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन व महिला व बालकल्याण समिती सभापतींची निवड उद्या, शुक्रवारी विशेष सभेत होत आहे. महिला बालकल्याण सभापतिपदी कॉँग्रेसच्या लीला धुमाळ यांची निवड निश्चित आहे. मात्र, ‘स्थायी’साठी राष्ट्रवादीचे आदिल फरास व जनसुराज्य पक्षाच्या मृदुला पुरेकर, तर परिवहनसाठी कॉँग्रेसचे अजित पोवार व ‘जनसुराज्य’चे प्रकाश नाईकनवरे यांच्यात लढतीची चिन्हे आहेत. ‘व्हिप’ बजावूनही सदस्य फोडण्याच्या प्रक्रियेला वेग आल्यानेच आज, गुरुवारी सकाळी बैठक घेऊन आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य या पक्षांच्या सदस्यांना उद्या, शुक्रवारी सकाळी दहापर्यंत अज्ञातस्थळी जाण्याचा सल्ला दिला. याप्रमाणे सायंकाळी चार वाजता नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले.
गेल्या चार वर्षांपासून एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य आघाडीत स्थायी व परिवहन समिती सभापतिपदावरून फूट पडली. स्थायी व परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांविरोधात अनुक्रमे मृदुला पुरेकर व प्रकाश नाईकनवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण हातात घेतले आहे.
पुरेकर व नाईकनवरे यांच्या बंडाकडे सुरुवातीस सहजवृत्तीने पाहणारे नेतेही आता गंभीर झाले आहेत. कोणताही धोका नको, यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर आघाडीच्या नगरसेवकांनी बैठक घेतली. बंड थंड होते का याची चाचपणी केली. शेवटी प्रा. जयंत पाटील यांनी पुरेकर व नाईकनवरे हे निवडणूक लढविण्याबाबत ठाम असल्याचे स्पष्ट केल्यानंतर संबंधित सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी जाण्याचा सल्ला मुश्रीफ यांनी दिला.
त्यानुसार आज, गुरुवारी दुपारी चार वाजता आघाडीचे सर्व नगरसेवक व सदस्य सहलीसाठी रवाना झाले आहेत. उद्या सकाळी साडे दहावाजेपर्यंत हे सर्व सदस्य सहलीवरून थेट महापालिकेत विशेष सभेला येणार आहेत. अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. या सभेत समिती सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
नेत्यांचा विश्वास उडाला
आघाडी अभेद्य आहे म्हणणाऱ्या नेत्यांनी स्थायी व परिवहन समितीवरील काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्यच्या सदस्यांना अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचा व्हिप बजावला. व्हिप डावलून निवडणूक लढविली अथवा बंडखोर उमेदवारांना मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांविरुद्ध पक्षाच्या गटनेत्यांकडून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस महापौरांकडे करण्यात येईल, असेही अनेक सदस्यांना बजावण्यात आले. सभापती निवडणुकीवेळी हात वर करून मतदान करायचे आहे. त्यामुळे कोणी विरोधात मतदान केले हे त्याचवेळी सभागृहात स्पष्ट होणार होते. तरीही नेत्यांनी ‘रिस्क’ नको म्हणून सदस्यांना सहलीवर धाडले. याचा अर्थ नेत्यांचा सदस्यांवर किंवा सदस्यांचा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
- माजी नगरसेवक, रमेश पुरेकर