परफेक्ट वन, कदम अकॅडमीचा विजय
By Admin | Updated: May 15, 2015 23:32 IST2015-05-15T23:28:58+5:302015-05-15T23:32:55+5:30
क्रिकेट : खानवलकर चषक १२ वर्षांखालील स्पर्धा

परफेक्ट वन, कदम अकॅडमीचा विजय
कोल्हापूर : परफेक्ट वन क्रिकेट अकॅडमीने स्काय स्पोर्टस्चा, तर रमेश कदम क्रिकेट अकॅडमीने पॅकर्स क्रिकेट क्लबचा पराभव करीत कै. विश्वनाथ खानवलकर १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
शाहू स्टेडियम येथे परफेक्ट वन संघ व स्काय स्पोर्टस यांच्यात सामना झाला. हा सामना ७९ धावांनी परफेक्ट वनने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना परफेक्ट वन संघाने २७ षटकांत ४ बाद १७० धावा केल्या. यामध्ये यश कोरोचे ३७, कौशल माने नाबाद ३१, प्रशांत देढे १९, मेहुल शिंदे याने १० धावा केल्या. स्काय स्पोर्टसकडून कुणाल पाटील, आदित्य बराले, ओम भंडारी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या स्काय स्पोर्टसचा डाव २० षटकांत सर्वबाद ९१ धावांत गुंडाळला. यामध्ये कुणाल पाटील याने १२, तर सार्थक पाखरेने १० धावा केल्या. परफेक्ट वनकडून यशवर्धन पाटीलने ३, कौशल मानेने २, तर यश कोरोचे व मेहुल शिंदे यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसरा सामना कागल येथे रमेश कदम अकॅडमी विरुद्ध पॅकर्स क्रिकेट क्लब यांच्यात झाला. हा सामना कदम अकॅडमीने २४ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना कदम संघाने ३० षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या. यामध्ये दर्शन पाटीलने २५, प्रथमेश पाटीलने १७, अथर्व पाटीलने नाबाद ११, तर हर्षजित पाटीलने १० धावा केल्या. पॅकर्सकडून आदिनाथ बोभाटेने २, सुजय लोहार व आशितोष देसाई यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पॅकर्स संघाचा डाव ३० षटकांत ८ बाद १२९ धावांत आटोपला. यामध्ये हर्ष पोवार २९, अथर्व पाटील १९ धावा केल्या. कदम अकॅडमीकडून प्रथमेश पाटीलने ३, तुषार नाईक, अथर्व पाटील व दर्शन पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.