निवडणुकीच्या मैदानात तरुणाईचा टक्का वाढला
By Admin | Updated: October 9, 2014 00:46 IST2014-10-09T00:43:30+5:302014-10-09T00:46:38+5:30
विधानसभा : पन्नाशीच्या आतील सुमारे ९८ उमेदवार; युती, आघाडीतील बिघाडीने मिळाली संधी

निवडणुकीच्या मैदानात तरुणाईचा टक्का वाढला
संतोष मिठारी-- कोल्हापूर -स्वबळावर लढण्याच्या भूमिकेतून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती तुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. मात्र, आघाडी आणि युतीमध्ये झालेली बिघाडी तरुणाईच्या पथ्यावर पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारीमध्ये तरुणाईचा टक्का वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतून ५० वर्षांच्या आतील सुमारे ९८ युवा उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
आघाडी असो की युती; यांच्याकडून आतापर्यंत मतदारसंघात दबदबा असलेले ज्येष्ठ, वयस्कर आणि अनुभवी नेतृत्वाला उमेदवारीबाबत प्राधान्य होते. तरुणांना अधिकतम संधी मिळत नव्हती. त्यामुळे संघटनकौशल्य, संपर्क असूनही अनेक तरुण चेहऱ्यांना प्रचारयंत्रणेत काम करावे लागत होते. मात्र, या वर्षीच्या निवडणुकीत हे चित्र बदलले. आघाडी, युतीची स्वबळावर लढण्याची भूमिका तरुणाईच्या पथ्यावर पडली. निवडणुकीच्या रणांगणातील पक्षांची संख्या वाढल्याने त्यांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, भाकप या पक्षांनी तरुण चेहऱ्यांना उमेदवारी देण्यावर भर दिला. बंडखोर, अपक्ष म्हणूनही मैदानात उतरलेले अधिकतम तरुणच आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीत २०८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ८७ जणांनी माघार घेतल्याने १२१ जण रिंगणात असून त्यापैकी सुमारे ९७ उमेदवारांचे वय हे ५० वर्षांच्या आतील आहे.
कागल वगळता चंदगड, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी, करवीर, शाहूवाडी, शिरोळ मतदारसंघांत ९० टक्के उमेदवार तरुण आहेत. लोकसभा निवडणुकीतील नवमतदारांची भूमिका लक्षात घेऊन संबंधित पक्षांनी तरुणांना उमेदवारी देऊन नवमतदारांना ‘कॅच’ करण्याचा उद्देश साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याला कितपत यश मिळणार हे १९ आॅक्टोबर रोजी समजणार आहे.