कोल्हापूर खंडपीठासाठी जनआंदोलन

By Admin | Updated: February 15, 2017 23:33 IST2017-02-15T23:33:39+5:302017-02-15T23:33:39+5:30

एन. डी. पाटील : सर्वपक्षीय शिष्टमंडळाची २६ ला पालकमंत्र्यांसोबत बैठक

People's movement for Kolhapur division | कोल्हापूर खंडपीठासाठी जनआंदोलन

कोल्हापूर खंडपीठासाठी जनआंदोलन

कोल्हापूर : खंडपीठप्रश्नी सर्व आंदोलनांची हत्यारे निष्प्रभ ठरत असल्याने आता या प्रश्नाची तड लावण्यासाठी व्यापक व तीव्र जनआंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले. या जनतेच्या लढ्यात आपण स्वत: सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी शिष्टमंडळास सांगितले.
कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी आता सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी प्रा. एन. डी. पाटील यांची रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या आंदोलनापूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित केली आहे. प्रा. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यात खंडपीठासाठी अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली होती. तिची कार्यवाही होण्याबाबत पालकमंत्री पाटील यांच्यासोबत चर्चा करू, असेही प्रा. पाटील म्हणाले.
शिष्टमंडळात निमंत्रक आर. के. पोवार, अ‍ॅड. प्रकाश मोरे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे, तसेच मराठा आंदोलनाचे वसंतराव मुळीक, नामदेवराव गावडे, आनंद माने, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)


मोदींना साकडे घालू : संभाजीराजे
जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने खा. संभाजीराजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, खंडपीठासाठी वेळप्रसंगी पंतप्रधान मोदी यांना साकडे घालूच पण कायदामंत्र्यांचीही भेट घेऊ. जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले.


कोल्हापूर खंडपीठप्रश्नी जनआंदोलन उभारण्याबाबत सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी ज्येष्ठ नेते
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची कोल्हापुरात त्यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

Web Title: People's movement for Kolhapur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.