लोक ‘गयारामां’ची दखल घेणार नाहीत
By Admin | Updated: August 31, 2014 00:28 IST2014-08-31T00:27:27+5:302014-08-31T00:28:32+5:30
आर. आर. पाटील : निवडणुकांच्या तोंडावर ‘आवक-जावक’ होतेच

लोक ‘गयारामां’ची दखल घेणार नाहीत
कोल्हापूर : निवडणुकांच्या तोंडावर पक्षाचे तिकीट मिळाले नाही की आवक-जावक ही होतच असते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची दखल पक्ष घेत नाहीच; परंतु लोकसुद्धा त्यांची दखल घेणार नाहीत, असा टोला पक्षातून बाहेर पडणाऱ्या गयारामांना आर. आर. पाटील यांनी आज, शनिवारी येथे हाणला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
सांगलीला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळ येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आर. आर. पाटील म्हणाले, जातीयवादी पक्षांना रोखणे व धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभागणी होऊ न देणे हीच राष्ट्रवादी कॉँग्रेसची ठाम भूमिका आहे. निवडणुकीच्या तोंडावर आवक-जावक ही होतच असते. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉँग्रेसमधूनही काही लोक संधी मिळत नाही, म्हणून बाहेर पडत आहेत; परंतु अशा लोकांची पक्ष दखल घेत नाही. शिवाय लोकसुद्धा त्यांची दखल घेत नसतात.
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. स्वयंसेवकांसह राखीव पोलीस दल तसेच केंद्रीय पोलीस दलाचे जवान बंदोबस्तासाठी आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडेल. उजळाईवाडी येथे स्फोट झालेले बॉम्ब हे गावठी आहेत. प्रथमदर्शनी हे बॉम्ब दहशतवादाशी संबंधित नसल्याचे दिसून आले आहे. तरीही या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)