शिरोळ तालुक्यातील जनतेला आमसभेची प्रतीक्षा

By Admin | Updated: January 13, 2015 22:53 IST2015-01-13T22:53:37+5:302015-01-13T22:53:37+5:30

नूतन आमदारांकडून अपेक्षा : रस्ते, गावागावांतील पिण्याचा पाणीप्रश्न सोडवणुकीसाठी आमसभेची मागणी

People of Shirol taluka await the general election | शिरोळ तालुक्यातील जनतेला आमसभेची प्रतीक्षा

शिरोळ तालुक्यातील जनतेला आमसभेची प्रतीक्षा

संदीप बावचे - जयसिंगपूर - ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ याचाच प्रत्यय शिरोळ तालुक्यातील आम जनतेला येत आहे. वैयक्तिक प्रश्नांबरोबरच तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ते, गावागावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यासह विविध प्रश्न जनतेसमोर आवासून उभे आहेत. बऱ्याच वर्षात तालुक्यात आमसभा झालेली नाही. नूतन आमदार उल्हास पाटील यांच्याकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. यामुळे आ. पाटील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमसभा बोलाविणार का? असा प्रश्न नागरिकांतून होत आहे.
दोन शहरे व ५३ गावांनी शिरोळ तालुका व्यापलेला आहे. पंचगंगा, कृष्णा, वारणा व दूधगंगा या चार नद्यांमुळे तालुका सुजलाम् सुफलाम झाला आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय प्रामुख्याने तालुक्यात केला जातो. दोन जिल्हे आणि कर्नाटक राज्याशी संपर्क येणाऱ्या या तालुक्याला प्रामुख्याने दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले असले तरी मजबूत रस्ते न झाल्याने पुन्हा हे रस्ते मरणयातना भोगत आहेत. शासनाने तालुक्यातील ३८ गावांमध्ये पेयजल योजना राबविली असली तरी बहुतांश योजना अजूनही पूर्णत्वास आलेल्या नाहीत. यामुळे गावोगावचा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ‘जैसे थै’च आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न तर पाचवीलाच पूजला आहे. पाणी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनत चालल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. क्षारपड जमिनीचा प्रश्नही ‘जैसे थै’च आहे. तालुक्यातील या प्रमुख प्रश्नांबरोबरच ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ याचाच प्रत्यय सर्व शासकूय कार्यालयांत अनुभवास मिळत आहे. एजंटगिरी फोफावल्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. आठ-आठ दिवस हेलपाटे मारूनही कामे होत नाहीत, एजंटामार्फत गेल्यास अर्थपूर्ण वाटाघाटीतून कामे होतात, अशा तक्रारी नागरिकांतून होत आहेत. यामुळे महसूल विभागाविषयी जनतेतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, पाटबंधारे विभाग, सहायक निबंधक कार्यालयातही अशीच परिस्थिती आहे. जनतेच्या या प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमसभा बोलाविली जाते.
प्रस्तापितांना धक्का देत आणि ज्या अपेक्षेने आमदार म्हणून निवडून दिले आहे ते अभ्यासू व तालुक्यातील प्रश्नांची जाण असणारे आमदार उल्हास पाटील यांनी आमसभा घेण्यासाठी प्रयत्न करण्याची
गरज आहे. बऱ्याच वर्षांपासून शिरोळमध्ये आमसभा झालेली नाही. यामुळे जनतेचे प्रश्न समजून येत नाहीत. शासकीय कामांबरोबर तालुक्यातील प्रमुख प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी आमसभेची खरी गरज बनली आहे.

दरवर्षी आमसभा होणे गरजेचे आहे. जनतेचे नेमके कोणते प्रश्न आहेत. शिवाय ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्यांचे नेमके प्रश्न पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर आल्याशिवाय ते समजणार नाहीत. यामुळे आमसभा महत्त्वाची आहे. प्रश्न सुटतील न सुटतील, मात्र प्रश्न जाणून घेण्याची गरज आहे.
- धनाजी चुडमुंगे, शिरोळ


सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी आमसभा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. तालुक्यात बऱ्याच वर्षांपासून आमसभा झालेली नाही. शासकीय कामांचा निपटारा वेळेत होण्यासाठी आमदारांनी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
- विश्वास बालीघाटे, शिरढोण

Web Title: People of Shirol taluka await the general election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.