धनगरवाड्यातील लोक रस्ता नसल्याने जगताहेत शापित जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:52+5:302021-06-18T04:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : एरंडपे (ता. भुदरगड) येथील धनगरवाड्याला प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पायपीट करावी ...

धनगरवाड्यातील लोक रस्ता नसल्याने जगताहेत शापित जीवन
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : एरंडपे (ता. भुदरगड) येथील धनगरवाड्याला प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पायपीट करावी लागते. येथील रहिवासी आजही आदिवासी जीवन जगत आहेत. अनेकांना वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने जीव गमवावे लागले आहेत. शासन या लोकांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी आपल्या अटी आणि शर्ती शिथिल करणार का? असा प्रश्न तेथील रहिवासी विचारत आहेत.
एरंडपे गावापासून सुमारे तीन किमी अंतरावर डोंगरकपारीत दोन वाडींवर धनगरवाडा वसलेला आहे. येथे आजही रस्ता, नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात अन्य भागाशी संपर्क तुटतो. वनखात्याच्या जाचक नियमांमुळे मूळ भूमिपुत्र आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. १९७२ साली ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना झाली. वाड्यावरील जवळ जवळ ८० टक्के भाग जंगलांनी व्यापल्यामुळे शिक्षण, व्यापार, दळणवळण, आरोग्य यांसह अन्य सुविधांपासून हा भाग वंचित राहिला आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या भागात पंचवीस वर्षांत कोणत्याच सुविधा झाल्या नाहीत. आजही धनगरवाड्यावरील फोंडे, येडगे, पटकारे वस्तीतील धनगरवाड्यांवर जायला रस्ता नाही. यातील प्रत्येक वस्तीत २० ते २५ घरे आहेत. बदलत्या परिस्थितीचा लाभ घेत वाड्यांवरील युवकांनी दुचाकी वाहने घेतलेली आहेत. परंतु वाड्यापर्यंत जायला रस्ता नसल्यामुळे वाहने अर्ध्यावर ज्या ठिकाणी रस्ता संपतो त्याठिकाणी ठेवून जातात. तेथून पुढे पायी चालत जावे लागते. प्रत्येक आठवड्याला पिठाच्या गिरणीत दळपासाठी तसेच किराणामाल, भाजीपाला आणि अन्य उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींसाठी येथील महिलांना अडीच-तीन किलोमीटर अंतर पायी चालत यावे लागते. या भागातील लोकांना दळण-वळणासाठी डांबरी रस्ता व्हावा यासाठी अजूनही शासकीय स्तरावरून प्रयत्न होताना दिसत नाहीत.
वाड्यावरून गावात येताना पावसाळ्यात अनेक ओढे-नाले दुथडी भरून वाहत असतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी मुले या रस्त्यावरून एरंडपे येथे जा-ये करत असतात. आपत्कालीन परिस्थितीत आजारी व्यक्ती आणि गर्भवती मातांना प्रसूतीसाठी घोंगडी डोली(पाळणा) करून न्यावे लागते.
या धनगरवाड्यातील एका गर्भवती मातेला सहा जून रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यावर प्रसूतीसाठी पाळणा करून मधून अडीच-तीन किलोमीटर पायी आणण्यात आले. प्रसूतीसाठी खूप उशीर झाल्याने बाळ गुदमरून मरण पावले. सुदैवानं माता वाचली; पण तिच्या बाळाला वाचवता आले नाही.
या वाड्यावर वाहने जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून युवासेनेच्या श्रावण पाटील आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांना अद्याप यश मिळालेले नाही.
वनखात्याच्या निर्बंधांमुळे रस्त्याचे काम व डांबरीकरण होत नाही. दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी नवनवीन आमिषे दाखवतात; पण शासनाच्या धोरणामुळे विकास होत नाही. त्यामुळे आमच्या पदरी मात्र काहीच पडत नसल्याची खंत युवासेनेच्या श्रावण पाटील, सुशांत फोंडे, सगू फोंडे, वनराज फोंडे, पांडुरंग फोंडे, लहू पाटील आणि वाड्यावरील अन्य लोकांनी व्यक्त केली.
१७ धनगरवाडा रस्ता
फोटो ओळ १) धनगरवाड्यावर जाण्याचा रस्ता, पायी चालणारे धनगरवाड्यातील ग्रामस्थ.
२) डोलीमधून रुग्णाला दवाखान्यात नेत असताना. (सौजन्य इंटरनेट)