दाखल्याअभावी थांबली पेन्शन
By Admin | Updated: January 14, 2015 00:43 IST2015-01-13T23:47:59+5:302015-01-14T00:43:55+5:30
निष्काळजीपणा : बँक व पेन्शनर्सच्या चालढकलपणामुळे कोषागार वेठीस

दाखल्याअभावी थांबली पेन्शन
फुलेवाडी : दरवर्षी पेन्शनर्सनी पेन्शन सुरू राहण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचा दाखला बॅँकेत देणे गरजेचे असते. त्याअगोदर दोन महिने कोषागार कार्यालयाकडून योग्य ते दाखले व सूचना बॅँकांना दिलेल्या असतात. तरी यावर्षी १६०० पेक्षा जास्त पेन्शनर्सचे हयातीचे दाखले जमा झाले नाहीत. कोषागार कार्यालय संपूर्ण संगणकीकृत असल्याने ज्यांचे दाखले मिळाले नाहीत त्यांची पेन्शन आपोआप थांबली गेली आहे.
हयातीच्या दाखल्याबाबत वेळोवेळी आवाहन केले जाते. साधारणपणे १० डिसेंबरपर्यंत सर्वांचे दाखले कोषागार कार्यालयात बॅँकेमार्फत येणे अपेक्षित असते. वास्तविक बॅँकांची नैतिक जबाबदारी आहे की, त्यांनी नोव्हेंबरमध्ये प्रत्येक पेन्शनर्सकडून हयातीचा दाखला घ्यावा; पण बॅँक आॅफ महाराष्ट्र, लक्ष्मीपुरी शाखा, बॅँक आॅफ इंडिया यासारख्या अनेक बड्या बॅँकांनी आपल्याकडील एकाही पेन्शनर्सचा एकही दाखला कोषागार कार्यालयात जमा करण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्या शाखेतील सर्वांची पेन्शन थांबली. यावरून बॅँकांमधून पेन्शनर्सना मिळणारी सापत्नभावाची वागणूक पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पेन्शन थांबल्यामुळे गेले काही दिवस कोषागार कार्यालयात चौकशीसाठी व दाखले जमा करण्यासाठी पेन्शनर्सची गर्दी होत आहे. या कारणामुळे कोषागार कार्यालयातील कर्मचारी आॅफिस आदेशानुसार थांबलेल्या पेन्शनर्सची पेन्शन जमा करण्यात व्यस्त आहेत. तयार केलेले पेन्शनचे प्रस्ताव सही करून मंजूर करण्यासाठी अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) शनिवारी कार्यालयात उपलब्ध नव्हते.
पेन्शनर्सनींही प्रत्येक नोव्हेंबरमध्ये न चुकता स्वत:च्या हयातीचा दाखला देणे गरजेचे आहे, अन्यथा आपली पेन्शन थांबून आपणास आर्थिक विवंचनेस सामोरे जावे लागण्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. ज्यांनी अजूनही हयातीचे दाखले जमा केले नसतील त्यांनी ते बॅँकेच्या मॅनेजरच्या सहीने कोषागार कार्यालयात जमा करावेत. तद्नंतरच त्यांची पेन्शन जमा करता येईल, असे आवाहन कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांनी केले आहे. ( प्रतिनिधी )
कोल्हापुरात २८ हजारांपेक्षा जास्त पेन्शनर्स आहेत. त्यापैकी १६००हून अधिक पेन्शनर्सनी हयातीचे दाखले जमा केले नाहीत. त्यांची पेन्शन थांबली आहे. आतापर्यंत ज्यांनी दाखले जमा केले आहेत त्यांची आर्थिक कुचंबणा थांबविण्यासाठी पेन्शन वितरित करण्याची कार्यवाही करण्यास सांगितले आहे. अजूनही ज्यांनी दाखले दिले नाहीत त्यांनी ते त्वरित कार्यालयात जमा करावेत.
- रमेश लिधडे
(जिल्हा कोषागार अधिकारी)