पेन्शन आता एक तारखेलाच मिळणार
By Admin | Updated: July 5, 2014 01:02 IST2014-07-05T00:56:41+5:302014-07-05T01:02:52+5:30
कोषागार संचालनालयाचे पाऊल : ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे होणार बंद

पेन्शन आता एक तारखेलाच मिळणार
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
राज्यभरातील सहा लाखांहून अधिक पेन्शनधारकांना आता यापुढे पेन्शन जमा झाली का म्हणून बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच त्यांच्या खात्यावर ही पेन्शन जमा होणार आहेच शिवाय ती जमा झाल्याचा मोबाईल मेसेजही त्यांना घरबसल्या मिळणार आहे. ही कार्यप्रणाली राज्याच्या लेखा आणि कोषागार संचालनालयाने विकसित केली आहे. त्यासाठीचा सर्व्हर हा पहिलाच महिना असल्याने स्लो झाल्याने या महिन्यातील पेन्शन सोमवारी संबंधितांच्या खात्यावर जमा होईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कोल्हापुरातील पेन्शनधारकांची पेन्शन उद्याच (शनिवारी) खात्यावर जमा होईल, असे येथील कोषागार कार्यालयातून सांगण्यात आले.
काही ठिकाणी ‘आयएफएससी’ कोडची अडचण, जुने कर्मचारी, संगणकांचा तुलनेत कमी वापर यामुळे काही अडचणी आल्या; परंतु त्यावर मात करून पेन्शन देण्यास हे संचालनालय यशस्वी झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते एक तारखेलाच अदा होत असतील तर मग पेन्शन का दिली जात नाही, असा विचार करून हे ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी करणारे पाऊल लेखा आणि कोषागार संचालनालयाने उचलले आहे. आतापर्यंत त्या-त्या जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयांतून पेन्शनधारकांची ज्या बँकेत खाती आहेत, त्या बँकेच्या नावे एकत्रित धनादेश पाठविला जाई. तो धनादेश पुन्हा क्लिअरिंगसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येई. त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दुर्गम किंवा लांब असलेल्या गावांतील (उदा. गगनबावडा, चंदगड अशा) पेन्शनधारकांना पेन्शन जमा होण्यास दरमहा २० तारीख येई. ही व्यवस्था बंद करून आता जसे वेतन अदा केले जाते त्याच पद्धतीने पेन्शन जमा करण्यात येत आहे. त्यासाठी स्टेट बँकेच्या अंधेरी (मुंबई) येथील सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) या यंत्रणेचा वापर करण्यात आला. ही यंत्रणा वापरण्यासाठी बँकांचा ‘आयएफएससी’ कोड महत्त्वाचा असतो. तो कोड काही बँकांकडून चुकीचा देण्यात आला व एकाचवेळी राज्यभरातील सुमारे तीस जिल्ह्यातील (औरंगाबाद महसूलमधील जिल्हे वगळून) सगळ््याच पेन्शनधारकांची पेन्शन या यंत्रणेद्वारे देण्यास सुरू केल्याने सर्व्हर काही प्रमाणात स्लो आला व त्यामुळेच या महिन्यात एक तारखेला पेन्शन जमा होऊ शकलेली नाही. पेन्शन कधी जमा होणार म्हणून बँका व कोषागार कार्यालयाकडे लोकांची वारंवार विचारणा होत आहे. म्हणून ‘लोकमत’ने या कार्यालयांशी संपर्क साधला. राज्यभरातील सर्व पेन्शनधारकांना सोमवारपर्यंत कोणत्याही स्थितीत पेन्शन मिळू शकेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सेवा देणारे पहिले राज्य
१ तारखेला पेन्शन जमा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पेन्शन जमा करून मोबाईलवर त्याचा अलर्टही ज्येष्ठांना मिळेल, अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत, अशी माहिती लेखा व कोषागार संचालनालयाचे राज्य प्रशासकीय अधिकारी (पेन्शन) यशवंत सोनार यांनी दिली.