वसंतदादा साखर कारखान्याला दंड
By Admin | Updated: December 31, 2014 00:57 IST2014-12-31T00:54:57+5:302014-12-31T00:57:50+5:30
चंद्रकांत पाटील : एफआरपी न देणाऱ्या राज्यातील १०५ कारखान्यांना नोटिसा

वसंतदादा साखर कारखान्याला दंड
सांगली : गाळप परवाना नसताना येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केल्याने त्यांना प्रतिटन १०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतची नोटीसही त्यांना बजावण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, एफआरपी (कारखानानिहाय किमान वैधानिक दर) न देणाऱ्या राज्यातील १०५ कारखान्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कारखान्यांशी आम्ही द्वेषबुद्धीने वागणार नाही; पण अनावश्यक लाडही करणार नाही. एका बाजूला सदाशिवराव मंडलिक, दिलीप वळसे-पाटील यांच्या कारखान्यांना चांगला दर देणे परवडते, तर इतर कारखान्यांना ते का जमत नाही? काही कारखान्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बॅँकांमध्ये आहेत, तर वसंतदादा कारखाना कामगारांची देणी देऊ शकत नाही. या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. तरीही कारखान्यांना मदत म्हणून खरेदी कराची सवलत आम्ही दिली. आता एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक आहे.
हा दर दिला नाही, तर कारखान्यांना नोटिसा बजावून फौजदारी कारवाई केली जाईल. गळीत हंगाम सुरू होऊनही ज्यांनी वैधानिक दर दिलेला नाही, अशा राज्यातील १०५ कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही फौजदारी करू. वसंतदादा कारखान्याला गाळप परवानाच दिला नव्हता. त्यांनी तसाच कारखाना सुरू ठेवला आहे. त्यांना प्रतिटन १०० रुपये दंड लागू झाला आहे. त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)