दिवसभर शांतता, संध्याकाळी जोर
By Admin | Updated: October 7, 2014 00:55 IST2014-10-07T00:52:58+5:302014-10-07T00:55:21+5:30
निवडणुकीला अवघे दहा दिवस राहिल्याने पायाला भिंगरी बांधून स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे

दिवसभर शांतता, संध्याकाळी जोर
विधानसभा निवडणुकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. प्रचारफेऱ्या, कोपरा सभा, जाहीर सभा यासह वैयक्तिक गाठी-भेटींनी गल्लीबोळ निवडणूकमय झाला आहे. या प्रचाराच्या माहोलाचा मतदारसंघनिहाय ‘आखोंदेखा हाल’ आजपासून.....
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधून स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे. प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस उरले असतानाच उमेदवारांना आॅक्टोबर हिट आणि दुपारची वेळ टाळून मतदारांना साद घालावी लागत आहे. त्यामुळे दिवसा शांतता आणि संध्याकाळी जोर, असे चित्र आहे. दुसरीकडे या प्रचाराला मतदार राजाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने एकूणच संभ्रमाचे वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने आज, सोमवारी उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा आणि मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पूर्वी एखाद्या नेत्याची प्रचार सभा म्हटले की, परिसरातील नागरिक झुंडीच्या झुंडीने उपस्थित राहायचे. नेत्याने मतदान करण्यासाठी आवाहन करणाऱ्या रिक्षाभोवती पोरांचा घोळका जमायचा. पत्रक घेण्यासाठी तूतू-मैंमैं व्हायची. आता मात्र हे चित्र पालटल्याचेच जाणवले. इच्छुकांची प्रचार यंत्रणा भागाभागात, गल्लीबोळात फिरत असली तरी मतदारांनी त्याची फारशी दखल घेतलेली नाही. ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे महेश जाधव, काँग्रेसचे सत्यजित कदम, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार आणि कम्युनिस्ट पक्षाकडून रघू कांबळे निवडणूक लढवत आहेत. कसबा बावडा परिसराच्या रस्त्यांवर काँग्रेसचा हात आणि शिवसेनेचा भगवा हे दोन झेंडे फडकत आहेत. येथे आज सकाळी सत्यजित कदम यांची प्रचार फेरी झाली आहे. त्यानंतर परिसरात स्लाईड शोद्वारे उमेदवाराचे काम सांगणारी ट्रॉली उभी होती, जी बघायला एकही नागरिक आला नाही.
गत निवडणुकीत येथून आमदार क्षीरसागर यांना मताधिक्य मिळाले असले तरी यंदा पिंजार गल्ली वगळता ते परिसरात आलेले नाहीत. तर महेश जाधव यांना आम्ही अजून पाहिलेलेही नाही, अशी प्रतिक्रिया एका दुकानदाराने दिली. सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंतच सर्व प्रचार यंत्रणा राबवली जाते. दुपारी चारनंतर पुन्हा प्रचाराला सुरुवात होते. प्रचार फेऱ्यांना स्थानिक नागरिकांपेक्षा कार्यकर्ते आणि बाहेरच्या तरुणांचीच अधिक गर्दी असते.
प्रस्तुत प्रतिनिधीने यावेळी शिवाजी पेठ, वेताळमाळ तालीम, सोन्या मारुती चौक या परिसरात फेरफटका मारला असता या ठिकाणीदेखील मतदारांच्या प्रतिसादाविना फिरणाऱ्या रिक्षाच पाहायला मिळाल्या. सोन्या मारुती चौकात शिवसेनेचे प्रचार कार्यालय आहे.सायंकाळी पाच वाजता आमदार क्षीरसागर यांची पदयात्रा शाहूपुरी परिसरात सुरू झाली. ढोल-ताशांचा गजर आणि शिवसेनेचे गीत, धनुष्यबाणाच्या चिन्हासह फिरणारी वाहने, यामुळे येथे प्रचाराचा रंग अनुभवायला मिळाला. महेश जाधव यांची स्टेशन रोड परिसरात चार वाजता प्रचार फेरी होणार होती. परंतु, साडेपाच वाजून गेले तरी प्रचार फेरी सुरू झाली नव्हती. राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांनी आज सिद्धार्थनगर परिसरात हलगीच्या कडकडाटात पदयात्रा काढली.
गठ्ठा मतदान परिसरातच शांतता...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शनिवार पेठ हा परिसर येतो. या ठिकाणी तालमी आणि मंडळांची संख्या अधिक असल्याने गठ्ठा मतदान म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. मात्र, आज चौकशी केली असता या परिसरात एकही उमेदवार फिरकलाच नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, संध्याकाळी रिक्षा, ट्रॉलीवरून उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याचे समजले.
कमी वेळेत
मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान
युती-आघाडी या घोळात उमेदवार जाहीर होण्यास खूप उशीर झाल्याने इच्छुक उमेदवारांपुढे कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. उमेदवाराने परिसरात याआधी कामे केली असतील, त्यांचा जनसंपर्क असेल तर फारसा प्रश्न येत नाही. मात्र, काही उमेदवारांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने त्यांना ही कसोटी पार करावी लागत आहे. त्यामुळे अद्यापही बहुतांश परिसरात एकही उमेदवार पोहोचलेच नसल्याचे जाणवले.