आयजीएमच्या ४२ कर्मचाऱ्यांची रक्कम त्वरित द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:04+5:302021-08-18T04:31:04+5:30
इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटलमधील 'त्या' ४२ कर्मचाऱ्यांना १ मे २०१९ पासून काम व पगारही नाही. या महागाई व ...

आयजीएमच्या ४२ कर्मचाऱ्यांची रक्कम त्वरित द्यावी
इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटलमधील 'त्या' ४२ कर्मचाऱ्यांना १ मे २०१९ पासून काम व पगारही नाही. या महागाई व कोरोनाकाळात आयुष्य कसे जगायचे व संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा उद्विग्न सवाल करत शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या दोन टप्प्याची रक्कम तत्काळ देण्याची मागणी केली. प्राधान्याने या कर्मचाऱ्यांची देय रक्कम दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल राज्य शासनाकडे हस्तांतरित झाले. तेव्हापासून ४२ कर्मचाऱ्यांचा आरोग्य विभागाकडे समावेशनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा २६ महिन्यांपासून पगार नाही. उपजीविका चालविण्यासाठी या कर्मचाऱ्यांवर अन्य ठिकाणी काम करण्याची नामुष्की ओढावली आहे. मात्र, तरीही इतर ठिकाणी काम केल्याची तक्रार शासनाकडे केली जाते. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला. समावेशनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पगार देण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत किमान संसार चालविण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या दोन टप्प्याची रक्कम त्वरित देण्याची मागणी केली. मुख्याधिकारी नियोजित बैठकीसाठी बाहेरगावी असल्याने ते परत आल्यावर प्राधान्याने देय रक्कम देण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.