‘कोल्हापूर’वर पवारांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:34 IST2019-04-04T00:34:50+5:302019-04-04T00:34:55+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील रोजच्या घडामोडींचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्हॉट्स अॅपवर जात असल्याचे मंगळवारी ...

‘कोल्हापूर’वर पवारांची नजर
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील रोजच्या घडामोडींचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्हॉट्स अॅपवर जात असल्याचे मंगळवारी (दि. २) त्यांच्या दौऱ्यात निदर्शनास आले. त्या अहवालाच्या आधारेच त्यांनी काही कार्यकर्त्यांना त्याबाबत सूचना केल्या.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना टोकाचा विरोध केल्यामुळे मतदारसंघातील वातावरण बदलले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही पॅचअप करण्यासाठी पवार यांचा हा दौरा होता; परंतु प्रत्यक्षात तसे काही पॅचअप झाल्याचे दिसले नाही. नेत्यांच्या भेटीगाठी आणि त्यांचीच भाषणे असेच काहीसे या दौऱ्याचे स्वरूप राहिले. सतेज पाटील हे दिवसभर नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याशी संपर्क अथवा संवाद होऊ शकला नाही. पूर्ण दौºयात सतेज पाटील यांचा विरोध, तसेच सतेज यांनी केलेले बंड हाच मुख्य मुद्दा केंद्रस्थानी राहिला; परंतु त्याबद्दल उघड काही चर्चा अथवा त्यांचे बंड शमविण्याबाबत काही तोडगा मात्र निघाला नाही. ते आता एवढे पुढे गेले आहेत की त्यांची मदत मिळण्याची शक्यता नसल्याचेही काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
भैया माने एक नंबरवर
पवार यांना व्हॉट्स अॅपवर जी नावे गेली होती त्यामध्ये एक नंबरला आमदार हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैया माने व त्यापाठोपाठ व्ही. बी. पाटील यांचे नाव होते. त्यांच्यासह अन्य काही प्रमुख कार्यकर्त्यांची नावे त्या यादीत होती. हे लोक अजूनही पक्षासाठी काम करीत नसल्याचा तो रिपोर्ट होता. त्याबद्दल पवार यांनी व्ही. बी. यांनाही विचारणा केली. त्यांनी आपणांस महाडिक कुटुंबीयांकडून कोणत्याच कार्यक्रमास निमंत्रण दिले जात नसल्याने प्रचारात सहभागी होण्यास अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले.
शेट्टी यांचीही विचारपूस
मेळावा संपल्यावर पवार यांनी राजू शेट्टी यांना बोलावून घेऊन तुमच्या मतदारसंघात मी काही करायला लागते का, अशी विचारणा केली; परंतु शेट्टी यांनी त्याची काही गरज नसल्याचे त्यांना सांगितले. हातकणंगले मतदारसंघात महाडिक गट ‘स्वाभिमानी’च्या विरोधात काम करीत आहे, हे त्यांना माहीत असेलच; त्यामुळे मी काय त्यांच्याकडे तक्रार करणार नाही. असा विरोध संघटनेला नवा नाही. तो पत्करूनच आम्ही लढायची तयारी केल्याचे शेट्टी यांचे म्हणणे होते.
माजी नगरसेवकांबद्दल तक्रार
कोल्हापुरातील काही माजी नगरसेवकांना एकत्रित करून त्यांना प्रचारात उतरण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ‘रसद’ पुरविण्यात आली; परंतु ते अजूनही सक्रिय झाले नसल्याची तक्रार झाली. त्यांच्याशी नीट समन्वय साधला जात नसल्याने असे घडत असल्याचे एका पदाधिकाºयाने सांगितले.