राष्ट्रवादीच्या कार्यालयात भाजप आघाडीची घोषणा, पवार यांची ‘खास’ परवानगी

By Admin | Updated: January 19, 2017 22:27 IST2017-01-19T22:27:02+5:302017-01-19T22:27:02+5:30

जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती जिल्हा कार्यालयात सुरू असतानाच खासदार धनंजय महाडिक

Pawar's announcement in NCP's office, Pawar's 'special' permission | राष्ट्रवादीच्या कार्यालयात भाजप आघाडीची घोषणा, पवार यांची ‘खास’ परवानगी

राष्ट्रवादीच्या कार्यालयात भाजप आघाडीची घोषणा, पवार यांची ‘खास’ परवानगी

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 19 - जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती जिल्हा कार्यालयात सुरू असतानाच खासदार धनंजय महाडिक आणि आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी भाजपसोबत आघाडी करण्याची घोषणा केल्याने उपस्थित कार्यकर्त्यांवर अवाक् होण्याची वेळ आली. पक्षाचे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांच्यादेखतच ही घोषणा झाल्याने जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची झलकच या ठिकाणी पाहायला मिळाली. कांहीवेळ हे कार्यालय राष्ट्रवादीचे आहे की भाजपचे पोटकार्यालय असा प्रश्र्न कार्यकर्त्यांनाही पडला. जिल्हा कार्यालयात तीन तालुक्यांच्या मुलाखती झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीची भूमिका सांगितली. यावेळी दक्षिण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे का, अशी विचारणा केल्यानंतर ‘खासदार म्हणून त्यांनी तशी माहिती दिली, तुम्ही त्यांनाच विचारा,’ असे सांगत मुश्रीफ यांनी माईकशेजारीच बसलेल्या धनंजय महाडिक यांच्याकडे दिला. महाडिक यांनी यावेळी स्पष्टपणे काँग्रेसच्या विरोधात सर्वपक्षीयांना एकत्र करून आघाडी करणार असल्याचे सांगून टाकले. एवढ्यात ‘चंदगड’बाबत विचारल्यानंतर ‘कुपेकरवहिनींनी वरून परवानगी आणली आहे,’ असे मुश्रीफ म्हणाले. यावेळी कुपेकर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळावी यासाठी ‘खास परवानगी’ आणून भाजपचे गोपाळराव पाटील यांच्यासोबत आघाडीचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. ‘वरून परवानगी’ म्हणजेच थेट शरद पवार यांच्याकडूनच ही परवानगी मिळाल्याचे यावेळी लपून राहिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात नंतर भाजपसोबतच्या आघाडीची चर्चा चांगलीच रंगली होती. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व मुश्रीफ यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. कागल नगरपालिका निवडणूकीतही भाजपने मुश्रीफ यांना चांगलाच दम आणला होता. असे असताना पक्षातील दोन नेतेच शरद पवार यांच्याकडून परस्पर परवानगी आणून भाजपशीच घरोबा करत असल्याचे पाहून मुश्रीफ देखील निरुत्तर झाले.

भरवसा कुणाचा... शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात भाजपला पाठिंबा देण्याची भाषा विधानसभा निवडणूकीनंतर केली होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही परंतू तसे घडू शकते याचाच दाखला देणारी ही घडामोड आहे. पवार आणि राष्ट्रवादी कांही करू शकतात, त्यांचा नेम नाही हे सिध्द करणारी..! -----------------

Web Title: Pawar's announcement in NCP's office, Pawar's 'special' permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.