आजरा कारखान्याबाबत पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:50+5:302021-01-23T04:25:50+5:30
कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या थकहमीबाबत मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, अशी ...

आजरा कारखान्याबाबत पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार
कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या थकहमीबाबत मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. शुक्रवारी सकाळी आजरा साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.
पवार यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी असतानाही आजरा कारखान्याचे पदाधिकारी आल्यानंतर पवार यांनी त्यांना स्वतंत्र बसूया, असे सांगितले. सर्वांच्या भेटी झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतरही हे काम पुढे का गेले नाही, अशी विचारणा यावेळी पवार यांनी केली.
मुश्रीफ यांनी आपण आता मुंबईला गेल्यानंतर याबाबत पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो असे सांगितले. कारखान्याचे खाते एनपीएतून बाहेर काढणे गरजेचे आहे आणि थकहमीची रक्कमही कमी होते, असे यावेळी मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, संचालक मुकुंद देसाई यांच्यासह अन्य संचालकांनी कल्याणराव काळे कारखान्याला जसे कर्जाचे पुर्नगठन करून दिले तसे आजरा कारखान्यालाही करून देण्याची मागणी केली. यावर आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असे पवार यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी, संचालक सुधीर देसाई, अंजना रेडेकर, एम. के. देसाई, आजरा पंचायत समितीचे सभापती उदय पवार, कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, रमेश वांगणेकर उपस्थित होेते.
२२०१२०२१ कोल आजरा कारखाना
आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, संचालक मुकुंद देसाई उपस्थित हाेते.