सेनापती कापशी आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड
By Admin | Updated: May 13, 2015 00:47 IST2015-05-13T00:18:57+5:302015-05-13T00:47:50+5:30
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात : वैद्यकीय अधिकारी गैरहजर; सुविधांचा अभाव

सेनापती कापशी आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड
सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथील रुग्णांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या आरोग्य केंद्रातील कारभाराबाबत ग्रामस्थांत प्रचंड असंतोष आहे. वेळोवेळी तक्रार व आंदोलने करूनही या विभागातील अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.चिकोत्रा खोऱ्यातील २१ ते २२ गावांसाठी हे आरोग्य केंद्र आहे. दोन वर्षांपूर्वी येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते, परंतु दोन वर्षांपासून कर्मचारी आहेत, तर डॉक्टर नाहीत, डॉक्टर आहेत तर कर्मचारी नाहीत, अशी येथील अवस्था आहे. त्यामुळे रुग्णांना हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी येथील रुग्णांच्या संस्थेत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे.
चिकोत्रा खोऱ्यातील सुमारे ४० हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या कापशी आरोग्य केंद्रात आठ-आठ दिवस डॉक्टरही हजर नसतात. यावरून या विभागाला याचे किती गांभीर्य आहे याची कल्पना येते. दोन वर्षांपूर्वीच्या पावसात उडून गेलेले पत्रे आजतागायत बसविले नसल्यामुळे अवकाळी पावसामुळे संपूर्ण आरोग्य केंद्रात पाण्याचे तळे साचते. त्यातच कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली जाते.
या आरोग्य केंद्रात मूलभूत औषध पुरवठा असूनही त्याचा लाभ सामान्य माणसाला मिळत नाही. उलट रुग्णांना बाहेरील औषधे आणावयास सांगितले जाते. रेबीज व साप चावलेल्या लसीचे इंजेक्शन या आरोग्यकेंद्रात कधीच मिळत नाही. परिणामी अशा व्यक्तींना गडहिंग्लज किंवा कोल्हापूरला दाखल करावे लागते. या दरम्यान अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याचे कोणतेच सोयरसुतक या आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना नाही.
शवविच्छेदन विभागही आता अखेरची घटका मोजत आहे. परिणामी शवविच्छेदन करण्याकरिता मुरगूड अथवा गडहिंग्लजला मृतदेह घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. एकूणच या आरोग्य केंद्राच्या एकूण कारभाराबाबत लोकांच्यात संतप्त प्रतिक्रिया आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)