चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी पाटकर
By Admin | Updated: November 9, 2014 00:47 IST2014-11-09T00:47:55+5:302014-11-09T00:47:55+5:30
आरोप-प्रत्यारोप सुरूच : चित्रनगरी, वृद्ध कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही

चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी पाटकर
कोल्हापूर : गेले दोन महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावर अखेर आज, शनिवारी अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांची वर्णी लागली. या निवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी सर्व सभासदांना बरोबर घेऊन कोल्हापूर चित्रनगरीचा विकास आणि वृद्ध कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही दिली.
चित्रपट महामंडळाच्या कोल्हापुरातील कार्यालयात आज दुपारी एक वाजता अध्यक्ष निवडीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, खजिनदार सतीश बिडकर, अभिनेत्री अलका कुबल, संचालक संजीव नाईक, अनिल निकम, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती उपस्थित होते.
चित्रपट महामंडळाच्या २७ आॅगस्ट २०१३ रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी दावा केलेले विजय कोंडके व विजय पाटकर यांना समान मते पडल्यानंतर या दोघांनाही एक-एक वर्षासाठी अध्यक्षपदाचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार माजी अध्यक्ष विजय कोंडके यांची मुदत २७ आॅगस्टला संपणार होती; मात्र उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर करण्यात आलेला विनयभंगाचा आरोप प्रकरणात कोंडके यांनी महामंडळाची बाजू घेतली नाही म्हणून ४ आॅगस्टला संचालकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव करून त्यांना पदमुक्त केले होते.
कोंडके यांनी या ठरावाला न्यायालयात आव्हान दिल्याने गेले दोन-अडीच महिने अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. मात्र, आज महामंडळाच्या १० संचालकांनी पाटकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.
यावेळी पाटकर म्हणाले, मी १५ हजार सभासदांचा प्रतिनिधी म्हणून या खुर्चीवर बसलो आहे. गेले सव्वा वर्ष फक्त कोर्टकचेऱ्या आणि वादात गेले आहेत.
आता मी संचालकांना व चित्रपटसृष्टीतील कलावंतांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे सांगितले. तत्पूर्वी, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.