‘मार्जिन’मध्ये गुंतलाय पॅथॉलॉजी व्यवसाय
By Admin | Updated: March 11, 2015 00:31 IST2015-03-11T00:23:30+5:302015-03-11T00:31:56+5:30
संगनमताने रुग्णांची लूट : रुग्ण पाठविण्याच्या अटीवर बड्या हॉस्पिटलना फायनान्स

‘मार्जिन’मध्ये गुंतलाय पॅथॉलॉजी व्यवसाय
राजाराम लोंढे - कोल्हापूर शहरातील ठरावीक पॅथॉलॉजी मालकांनी जास्तीत जास्त रुग्ण आपल्याकडे पाठविण्याच्या अटीवर शहरातील बड्या हॉस्पिटलना फायनान्स पुरविण्याचा धडाकाच लावला आहे. कलेक्शन बॉय व डॉक्टरांची तर साखळीच तयार झाली असून, संगनमताने रुग्णांना लुटण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. पॅथॉलॉजीमध्ये घुसलेल्या खासगी सावकारीने सामान्य रुग्णांचा जीव मात्र गुदमरला आहे.
शहरात साधारणत: २० पॅथॉलॉजी कार्यरत आहेत. येथे रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. रुग्णांचे निदान योग्य होण्यासाठी अलीकडे सर्वच डॉक्टर ताप भरला तरी रक्त, लघवी तपासण्याचा सल्ला देतात. सुरुवातीला या तपासणीचे दर माफक होते; पण अलीकडे या व्यवसायाचे पुरते बाजारीकरण झाले आहे. याला केवळ पॅथॉलॉजीचे मालक जबाबदार नाही तर डॉक्टरही तितकेच जबाबदार आहेत.
अनेक डॉक्टरांकडे गरज नसताना रुग्णांना वेगवेगळ्या तपासण्या करावयास लावतात. या तपासण्या केल्या की त्यातील टक्केवारी डॉक्टरांना मिळते. तपासणीचे बिल मोठे असले तरी १५ टक्के व कमी असेल तर २० टक्के कटिंग डॉक्टरांचे असते. पण काही पॅथॉलॉजीमध्ये तब्बल ८० टक्क्यांपर्यंत कटिंग लावून रुग्णांना लुबाडण्याचा उद्योग सुरू आहे.
शहरातील नेहमी गजबजलेल्या पॅथॉलॉजी सेंटरमध्ये दिवसाला ५००
ते ६०० सॅम्पल येतात, एवढ्यांची तपासणी होते केव्हा, संबंधित जबाबदार डॉक्टरांना एवढ्या
वेळेत सह्णा करणेही अशक्य आहेत तरीही सकाळचा सॅम्पलचा
रिपोर्ट दुपारी संबंधित दवाखान्यांत पोहोच केला जातो. काही ठिकाणी
तर कलेक्शन बॉय स्वत:च रिपोर्ट
तयार करून संबंधित डॉक्टरांची स्वाक्षरी मारण्याचा प्रताप
करतात. सर्वच पॅथॉलॉजी
व हॉस्पिटलमध्ये असे प्रकार
होत नाहीत. दोन-तीन पॅथॉलॉजी सेंटरनी सारा जिल्हा अक्षरश: पोखरला आहे.
या व्यवसायावर कोणाचेच नियंत्रण नाही. दिवसेंदिवस या व्यवसायातील मार्जिन वाढू लागल्याने रुग्णांची दमछाक होत आहे.
ब्लड बॅँकांप्रमाणे अन्न व
औषध प्रशासन विभागाचे
नियंत्रण पॅथॉलॉजीवर गरजेचे आहे. शासनाचा अंकुश राहिला तरच रुग्णांची मान या दलालांच्या तावडीतून सुटणार आहे.
सॅम्पल टेबलवरच; तोपर्यंत रिपोर्ट हातात
गेल्या आठवड्यात कोकणातील डॉक्टर आपल्या वडिलांना घेऊन कोल्हापुरातील ऐतिहासिक चौकातील एका हॉस्पिटलमध्ये आले होते. रुग्णाच्या रक्ताच्या विविध चाचण्या करावयाच्या असल्याने तिथे कलेक्शन बॉय आला. डॉक्टरांनी (रुग्णांचे नातेवाईक) रक्ताची सॅम्पल टेबलावर ठेवली आणि डॉक्टर वडिलांना भेटायला गेले. भेटून येईपर्यंत रिपोर्ट हातात देऊन पैशांची मागणी केल्यानंतर डॉक्टरही अचंबित झाले. सॅम्पल टेबलवर असताना रिपोर्ट आला कोणाचा? असा जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर हॉस्पिटलच्या यंत्रणेची बोबडी वळली.
डॉक्टरांचा सांकेतिक कोड
एखाद्या रुग्णांच्या पाचपैकी दोन टेस्ट करणे गरजेचे असते; पण पाच लिहून द्यायच्या आणि करायच्या मात्र दोनच. यासाठी डॉक्टर आपल्या चिठ्ठीवर विशिष्ट प्रकारची खूण करतात, अशा पद्धतीनेही रुग्णांना लुटले जात आहे.
टक्केवारी सगळीकडे; पण कोल्हापुरात अतिरेक
डॉक्टर व पॅथॉलॉजी यांच्यामधील टक्केवारीचे नाते सगळीकडे आहे; पण येथे डॉक्टर आणि पॅथॉलॉजीचे मालक रुग्णांच्या मानेवर सत्तूरच ठेवतात. या अतिरेकामुळे रुग्ण हैराण झाले आहेत.
काही पॅथॉलॉजी सेंटरचा चांगला कारभार
शहरातील काही पॅथॉलॉजींचा चांगला कारभार आहे; पण काही डॉक्टर ठरावीक पॅथॉलॉजीसाठी आग्रही असल्यामुळे यामागचे टक्केवारीचे गणित लपून राहिलेले नाही.