प्रवाशांची अनभिज्ञता कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर
By Admin | Updated: March 12, 2015 00:05 IST2015-03-11T23:49:25+5:302015-03-12T00:05:14+5:30
'तक्रार वही'ची माहितीच नाही : एका वर्षात विभागीय कार्यालयात २४३ तक्रारी

प्रवाशांची अनभिज्ञता कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर
प्रदीप शिंदे - कोल्हापूर -प्रवासीभिमुख योजना राबवित असलेल्या एस.टी.च्या त्रुटी अथवा कमतरता दाखविणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी समजून घेण्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तक्रारवहीच्या सुविधेची माहिती प्रवाशांना देण्यात एस.टी.चे काही कर्मचारी अनुत्सुक असल्याने ‘प्रवासी तक्रार वही’बाबत प्रवासी अनभिज्ञ आहेत. हीच गोष्ट उद्धट वर्तणूककरणाऱ्या चालक-वाहकांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. राज्यात महामंडळाच्या बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी व एस.टी.त सुधारणा आणण्यासाठी प्रत्येक एसटीत, स्थानकात प्रवासी तक्रार नोंदवही ठेवण्यात येते. या वहीत प्रवाशांनी आपल्या तक्रारी व सूचना नोंदवू शकतात. महामंडळातर्फे या नोंदवहीची दखल घेऊन यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, काही कर्मचारी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार होऊ नये, यासाठी तक्रार वहीबाबत प्रवाशांना माहिती देत नाहीत. तसेच तक्रार वहीबाबत अजूनही म्हणावा तितका प्रसार व प्रचार न झाल्याने अनेक प्रवाशांना या तक्रार वहीबाबत काहीच माहिती नाही. एस. टी. प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
याविषयी तक्रारी, सूचना
बससेवा, वेळा, चालक व वाहक यांची वर्तणूक, स्वच्छतागृहातील स्वच्छता, प्रवास भाडे, पासेस, प्रवास भाडे परताव्याबाबतची तक्रार, महामंडळ नियुक्त एजन्सीजबाबत तक्रार, उपहारगृह व इतर आस्थापनांचा निकृष्ट दर्जा, दर, पिण्याचे पाणी याबाबत तक्रार किंवा सूचना लेखी करू शकतात.
आमच्याकडे कोणी तक्रार वही मागितली तर आम्ही ती देतो. ही वहीतील तक्रार वरिष्ठांना दाखवितो; तसेच वहीची वेळच्या वेळी तपासणी केली जाते. - निशांत चव्हाण, वाहक, कोल्हापूर
प्रत्येक एसटीमध्ये तक्रार नोंदवही असते, हे माहीतच नाही. वाहक व चालकांशी प्रवासादरम्यान वाद होतो. मात्र याची तक्रार कुठे करायची, हाच मुळात प्रश्न पडतो. - संग्रामसिंह घाटगे, यमगे, प्रवासी