पासार्डे तलावाला यंदा ३२ वर्षांनी पाझर फुटणार

By Admin | Updated: May 12, 2016 00:51 IST2016-05-11T23:20:01+5:302016-05-12T00:51:41+5:30

काम युद्धपातळीवर : परिसरातील सिंचन, पिण्याचा पाणीप्रश्न सुटणार

Passarda lakewalla this year will be a parasite after 32 years | पासार्डे तलावाला यंदा ३२ वर्षांनी पाझर फुटणार

पासार्डे तलावाला यंदा ३२ वर्षांनी पाझर फुटणार

मच्छिंद्र मगदूम --सांगरूळ -निकृष्ट कामामुळे १९८४ साली फुटलेला पासार्डे येथील पाझर तलाव गेली ३२ वर्षे कोरडाच आहे. मात्र, यंदा प्रशासनाने तलावाच्या दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेतले असून, काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून यंदाच्या पावसाळ्यात तलावात पूर्ण क्षमतेने पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील आटलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे. सन १९७२ मध्ये तत्कालीन कृषिराज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी शासनाकडून पाझर तलावाची मंजुरी घेतली. प्रत्यक्ष १२ वर्षांनी १९८४ ला तलावाच्या कामाला सुरुवात झाली. एक वर्षात कामही पूर्ण झाले; पण ठेकेदाराने तलावाला दगडी पिचिंग केले नाही. पावसाळ्यात तलाव भरण्यास सुरुवात झाली. मात्र, पिचिंग नसल्याने व निकृष्ट कामामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याआधीच वाहून गेला. या तलावामुळे ५०० एकर जमीन सिंचनाखाली येणार होती; पण तलाव फुटल्याने शेतीला फायदा होण्याअगोदरच शेतीचे नुकसान करून गेला. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या, शेतात गाळ साचला. शेतकरी व प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. येथील शेतकरी ३२ वर्षे पाण्याविना होरपळला आहे.
२०१३ साली एक कोटी ९१ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविला; पण हे काम मंत्रालयात रखडले.
याचदरम्यान करवीर तालुक्यातील आमशी गावच्या विमल पुंडलिक पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी पाठपुरावा करून तलावदुरुस्तीस डी.पी.डी.सी.मधून २ कोटी ३० लाखांचे बजेट मंजूर करून घेतले. लगेच कामाला सुरुवातही झाली. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या हे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दगडी पिचिंग व सांडव्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून पावसाळ्यात या तलावात पाणी अडविले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

Web Title: Passarda lakewalla this year will be a parasite after 32 years