१४५० चा पास फक्त ‘हजारात’
By Admin | Updated: January 6, 2015 00:58 IST2015-01-06T00:21:48+5:302015-01-06T00:58:20+5:30
रंकाळा स्टँडमधील गैरव्यवहार : सरकारी कर्मचारीही बनले ‘विद्यार्थी’

१४५० चा पास फक्त ‘हजारात’
कोल्हापूर : येथील रंकाळा स्टँडवर १४५० रुपयांऐवजी कामगारांना हजार रुपयांत विद्यार्थी सवलतीचा पास देऊन, प्रत्येक पासमागे दोनशे ते तीनशे रुपयांची कमाई केली जात असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. विशेष म्हणजे या ‘कमाई’च्या पासचा फायदा काही शासकीय कर्मचाऱ्यांनी घेऊन विद्यार्थी पासवर एस.टी.तून प्रवास केल्याचे समजते.
एस.टी. महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना ६६.६६ टक्के सवलतीच्या दराने विद्यार्थी पास दिला जातो; तर कामगारांना २० दिवसांचे भाडे भरून ३० दिवसांचा प्रवास अशी सवलत आहे. साधारणपणे एका मार्गावर दरमहा १४५० रुपयांत मिळणारा कामगार पास, संबंधित व्यक्तीला तो विद्यार्थी पास असल्याचे दाखवून हजार ते अकराशे रुपयांत दिला जात होता. यामुळे पास घेणाऱ्याचेही २०० ते ३०० रुपये वाचत होते. पास देणाऱ्या व्यक्तीलाही प्रत्येक पासमागे २०० ते ३०० रुपये मिळत होते. एस.टी. महामंडळाचे पास देणारी व्यक्तीच अशा सवलतीच्या दरात पास देत असल्याने अनेकांनी हे पास घेण्याचे धाडस केले. निलंबित वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांनी आतापर्यंत दहा लोकांना असा पास दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गैरव्यवहाराची रक्कम जास्त नाही.
शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रमाणित केलेला विहीत अर्ज, सवलतधारकाचा फोटो, बोनाफाईड सर्टिफिकेट अशी कागदपत्रे जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवास सवलतीचा पास दिला जातो. मात्र, या ठिकाणी या पाससाठी लागणारी सर्व बनावट कागदपत्रे जमा करून घेऊन संबंधितांनी हे पास दिल्याचे समजते. विद्यार्थी व कामगारांना सवलती पास देण्यासाठी वाहतूक नियंत्रक रंजना पाटील या फक्त एकट्या नसून, या प्रकरणी त्यांना आणखी कोणीतरी मदत करीत असल्याचा संशय महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बिंग फुटले कशामुळे...
रंजना पाटील यांचे पती एस.टी. खात्यातच नोकरीस होते, परंतु महामंडळातील नोकरभरतीत गैरव्यवहार प्रकरणात नाव आल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. रंजना पाटील यांना अनुकंपाखाली सेवेत घेण्यात आले, परंतु त्यांच्या वागणुकीबद्दल तक्रारी होत्या. त्यातूनच गैरव्यवहाराचे बिंग फुटल्याची चर्चा आहे.
पास सवलत..
रंकाळा स्टॅँड येथून दर महिन्याला २५०० विद्यार्थी सवलतीचा पास घेऊन प्रवास करतात; तर ८०० जण कामगारांचा पास घेऊन सवलतीच्या दरात प्रवास करतात. २०० जण त्रैमासिक पास घेतात.