ग्रामपंचायतीचे विभाजन गडमुडशिंगीकरांच्या मुळावर
By Admin | Updated: August 28, 2014 23:36 IST2014-08-28T23:19:34+5:302014-08-28T23:36:25+5:30
खुद्द प्रकल्पग्रस्तांचाही विरोध : ७०० एकर महसूल क्षेत्र गमावणार; ग्रामस्थांच्यावतीने न्यायालयात दाद मागणार : सरपंच

ग्रामपंचायतीचे विभाजन गडमुडशिंगीकरांच्या मुळावर
शिवाजी कोळी - वसगडे-चिंचवाड गावठाण हद्दवाढ, जंगल, प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन, दूधगंगा डावा कालवा, धरणग्रस्तांसाठी गावठाण अशा अनेक कारणांसाठी सुमारे सव्वापाचशेच्या वर एकर जमीन गमावून बसलेल्या गडमुडशिंगीकरांना ग्रामपंचायत विभाजनामुळे आता परत ७०० एकरांच्या महसूल (गायरान) क्षेत्राला मुकावे लागणार आहे. त्यामुळे ‘न्यू वाडदे’ची स्वतंत्र ग्रामपंचायत गडमुडशिंगीवासीयांच्या मुळावरच उठली आहे. आता काहीही झाले तरी गावाचे तुकडे पडू देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे गावच्या दक्षिणेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर धरणग्रस्तांची ‘न्यू वाडदे’ वसाहत १९८९ साली वसली. सुमारे ६५० ते ७०० लोकसंख्या असणाऱ्या या वसाहतीला मागील
२५ वर्षांपासून गडमुडशिंगी ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाण्याचा निचरा, वीज, शैक्षणिक व आरोग्य अशा सोयी- सुविधा पुरविल्या जातात. मुडशिंगीकरांनी या वसाहतीच्या स्थापनेसाठी याआधी पोटापाण्यासाठी जमीन म्हणून ३५ हेक्टर, तसेच राहण्यासाठी गावठाण म्हणून साडेदहा हेक्टर क्षेत्र दिल्याची वस्तुस्थिती आहे. गावातील विकास संस्था, पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून वसाहतीतील लोकांशी चांगलीच ‘नाळ’ जुळली असताना व ग्रामपंचायतीकडून सर्व सुविधा पुरविल्या जात असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी ग्रामपंचायतीच्या विभाजनाची मागणी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. किंबहुना वसाहतीतील सुमारे ४०च्या वर ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्राद्वारे
स्वतंत्र ग्रामपंचायतीस विरोध दर्शविला आहे.
गावसभेचा ठराव नसताना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आवश्यक ‘त्या’ निकषांची पूर्तता होत नसताना २५ फेब्रुवारीला ग्रामविकास व जलसंधारण विभागाने राजपत्र असाधारण भाग - ४ (अ) अनुसार ‘न्यू वाडदे’ हे स्वतंत्र महसूल गाव घोषित केले, तर शासनाचे कक्ष अधिकारी
श. र. साबळे यांनी राजपत्राच्या आदल्या दिवशीच स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा आदेश काढल्याने प्रशासनाचा सावळागोंधळ निदर्शनास आला आहे.